मागील निवडणुकीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाव उमेदवारांच्या यादीत येते की नाही, अशी शंका होती. यावेळी मात्र अधिकृत घोषणा होण्यापूर्वी दीड महिना अगोदर डॉ. पाटील यांना उमेदवारी मिळाल्याचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे दीड महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोषही साजरा केला. गुरुवारी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होऊनही त्या विषयीची विशेष उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली नाही. मात्र, डॉ. पाटील आणि त्यांच्या चिरंजीवांनी बुलेट प्रचारफेरी पूर्ण केली.
गतवेळेस लोकसभा निवडणुकीच्या वेळी डॉ. पाटील यांना उमेदवारी मिळेल काय, असे चित्र निर्माण झाले होते. या मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख, शिवराज पाटील-चाकूरकर यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. अखेरच्या क्षणी डॉ. पाटील यांच्याच नावाची घोषणा अधिकृतरीत्या करण्यात आली. नंतर डॉ. पाटील विजयी झाले.
या वेळेस मात्र त्यांच्या नावाची घोषणा पक्षाध्यक्ष पवार यांनी दीड महिन्यांपूर्वीच केली. निवडणुकीच्या कालावधीत डॉ. पाटील यांची बुलेटफेरी होतेच होते. उमेदवारी मिळणार हे माहीत असल्याने खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी त्यांची बुलेटफेरी देखील पूर्ण केली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही वेगळी बुलेटफेरी काढली. राष्ट्रवादीने प्रचाराला वेग दिला आहे. शिवसेनेचा मात्र अद्याप उमेदवार ठरलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padamsinh patil by ncp proneness start