aranya rishi maruti chitampalli passed away सोलापूर : आपले संपूर्ण आयुष्य जंगलात वेचलेले अरण्यऋषी मारुती भुजंगराव चितमपल्ली (वय ९३) यांचे सोलापुरात बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास निधन झाले. ते गेली काही वर्षे सोलापुरात मूळ गावी वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पुतण्या श्रीनिवास, भावजय आणि नातवंडे असा परिवार आहे.

चितमपल्ली यांना केंद्र सरकारने अलीकडेच पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता. नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारून परतल्यानंतर ते आजारी पडले होते. त्यांच्या पायाला जखम झाली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. हा आजार आणि वार्धक्य यामुळे बुधवारी रात्री राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चितमपल्ली यांचा जन्म सोलापुरात झाला होता. तेलुगू आणि उर्दू भाषकांच्या बुधवार बाजार, साखर पेठेत त्यांचे बालपण गेले. सोलापुरात नॉर्थकोट प्रशालेत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. सोलापुरात २००६ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. वनखात्यात ३६ वर्षे प्रदीर्घ काळ त्यांनी वनाधिकारी म्हणून सेवा बजावत असताना त्यांनी निसर्ग – वन्यजीवांचा सखोल अभ्यास केला होता. निसर्गविषयक विपुल लेखन त्यांनी केले. निवृत्तीनंतरही ते अनेक वर्षे जंगलात राहत होते. त्यांच्या रातवा या पुस्तकाला १९९३-९४ साली राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला होता. याशिवाय अन्य अनेक साहित्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.