पंढरपूर : मागील अकरा पिढ्यांपासून सुरू असलेली महाद्वार काल्याची परंपरा यंदा हरिदास कुटुंबात घडलेल्या अघटीत घटनेमुळे खंडित होणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, हरिदास कुटुंबातील अकरा वर्षीय बालकाच्या हातामध्ये श्री विठ्ठलाच्या पादुका देत काल्याची परंपरा जोपासण्यात आली. गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला म्हणत कार्तिकी यात्रेची सांगता झाली.
आषाढी व कार्तिकी वारीमध्ये हरिदास व नामदास घराण्याच्या वतीने महाद्वार काला करण्याची परंपरा आहे. संत पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष श्री विठ्ठलाने दिलेल्या पादुका मस्तकावर धारण करून महाद्वार काला करण्याची परंपरा आहे. दरम्यान, यंदा हरिदास घराण्यातील एका तरुणाचे अचानक निधन झाल्यामुळे महाद्वार काला साजरा होणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता.
मात्र, जवळपास ४०० वर्षांची परंपरा खंडित न करण्याचा निर्णय हरिदास, पुजारी व संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांनी घेतला. त्यानुसार ह.भ.प. मदन महाराज हरिदास यांचे अकरा वर्षांचे नातू अमोघ विनायक हरिदास याच्या गळ्यात पागोटे व हातात पादुका देण्यात आल्या.
नामदास महाराज यांनी अमोघ हरिदास यास खांद्यावर घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाच प्रदक्षिणा मारून मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली. यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात पादुकास नदी स्नान, माहेश्वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेस येथे दहीहंडी फोडून काल्याची परंपरा पूर्ण करण्यात आली. यावेळी जागोजागी गुलाल, बुक्का व लाह्याची उधळण करण्यात आली. गोपाळ काला गोड झाला… गोपाळाने गोड केला… असा जयघोष करण्यात आला. हजारो भाविकांनी काल्याचे दर्शन घेतले. हरिदासाच्या काल्याने यात्रेची सांगता झाली.
अशी आहे परंपरा
पंढरीत अनेक संतांच्या विविध परंपरा असून, यामध्ये महाद्वार काल्याचा देखील समावेश आहे. येथील हरिदास घराण्यात जवळपास चारशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या संत पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने आपल्या खडावा अर्थात पादुका दिल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून या घराण्यात या खडावा डोक्यावर घेवून काला करण्याची परंपरा आहे.
या परंपरेनुसार दुपारी बारा वाजता संत नामदेव महाराजांचे वंशज येथील काल्याच्या वाड्यात दिंडी घेवून येतात. येथून हा उत्सव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल झाला. सभामंडप येथे काल्याचे मानकरी असणाऱ्या ह.भ.प. मदन महाराज हरिदास यांना खांद्यावर घेवून पाच प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आल्या. यानंतर काल्याचा अभंग म्हणून दही हंडी फोडली व हंडीतील काला भाविकांना वाटला.
