Pankaja Munde : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी २५ जानेवारीपासून पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं आहे. आज २६ जानेवारीला सगेसोयरेची अधिसूचना काढून एक वर्ष पूर्ण झालं आहे. एक वर्ष झालं, मात्र समाज रस्त्यावर आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जीआर काढून त्याचे तातडीने वाटप करण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.तसंच ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्यांच्या सर्वच सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाण पत्र द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा दुसरा दिवस

जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथील त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. तर, दुसरीकडे जालना जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा पदभार मंत्री पंकजा मुंडेंनीस्वीकारला आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज ध्वजारोहण केल्यानंतर पंकजा मुंडेंनी पालकमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला असून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी, मनोज जरांगेंच्या आंदोलनास भेट देण्यासंदर्भातही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट देणार का? असं विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं आहे.

मनोज जरांंगेंबाबत काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

“मनोज जरांगे हे त्यांचा लढा लढत आहेत, त्यांच्या उपोषणाबद्दल माझ्या मनात सन्मान आहे. संविधानिक चौकटीत बसवून त्यांच्या, कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा हीच माझी भूमिका आहे. मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत, आज माझा जिल्ह्यातील पहिलाच दिवस आहे. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे. आपण एखाद्या आंदोलनास भेट देतो, तिथलं वातावरण कसं असतं ही जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे, ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि जर त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. मी तसा त्यांना निरोपही पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची वाट पाहीन, असे उत्तर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. पंकजा मुंडे ह्यांनी जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

अशोक चव्हाण लवकरच मनोज जरांगेंना भेटणार

भाजपा खासदार आणि मराठवाड्यातील मराठा नेते अशोक चव्हाण यांनीही लवकरच उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याचे म्हटलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतची उर्वरित विषय आहे, त्याचा पाठपुरावा आम्ही करणारच आहोत. मनोज जरांगेंनी मी विनंती करत आहे की, उपोषणाचा मार्ग न स्वीकारता सरकार आता नवीन आलेला आहे. आता, मला जरांगे पाटलाला भेटायची इच्छा आहे. उर्वरित मागण्या मी समजून घेईल, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, याही आधी १० टक्के आरक्षण दिलेले आहे आणि ते लागूदेखील केले आहे, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde answer about manoj jarange question what did she say scj