परभणी : माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद आता कोणाकडे येणार याबाबत उत्सुकता असून पक्षीय पातळीवर जिल्हाध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. नुकतीच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जालना येथे परभणी जिल्ह्यातील काँग्रेसच्या निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे गेल्या अनेक वर्षांपासून वरपूडकर यांच्याकडे होती, मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसला तातडीने जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करावी लागणार आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब रेंगे, रविराज देशमुख अशा काही नावांची चर्चा सुरू झाली आहे.
प्रदेश काँग्रेसच्या वतीने जी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली त्यात जिल्ह्यातील सहा जणांना संधी मिळाली आहे. माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, हे प्रदेश उपाध्यक्ष तर सिद्धार्थ हत्तीहंबीरे यांनाही कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी संधी मिळाली आहे. बाळासाहेब देशमुख यांच्याकडील उपाध्यक्षपद कायम ठेवण्यात आले असून सचिव म्हणून ॲड. मुजाहिद खान, नागसेन भेरजे, रवी सोनकांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान देण्यात आले असले तरी जिल्ह्यातून एकही ओबीसी कार्यकर्ता या कार्यकारिणीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माजी महापौर तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भगवानराव वाघमारे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळणे अपेक्षित होते.
अजित पवारांची राष्ट्रवादी, सत्ताधारी शिवसेना, भारतीय जनता पक्ष या प्रमुख राजकीय पक्षांनी जिल्हाध्यक्षपदावर तरुणांना संधी दिलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाकरी फिरवावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी जालना येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परभणी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी एका बैठकीत संवाद साधला. यावेळी माजी आमदार सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, बाळासाहेब देशमुख, रामभाऊ घाडगे, नदीम इनामदार, रविराज देशमुख, सुहास पंडित यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व नवे, जुने पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षपद अल्पसंख्याक समाजाला तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपद हे तरुण कार्यकर्त्याला देण्यात यावे, अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षपद फार काळ रिक्त ठेवू नये, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.