परभणी : जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून या निमित्ताने सरसकट जिल्हा अतिवृष्टीग्रस्त म्हणून ग्राह्य धरण्यात आला आहे. झालेल्या नुकसानीपैकी एकूण ८५ टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
परभणी जिल्ह्यातील एकूण ५२ महसूल मंडळात या पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. काही महसूल मंडळात तीन वेळा तर काही महसूल मंडळात चार वेळा अतिवृष्टी झाली आहे. सात वेळा अतिवृष्टी झालेलीही काही मंडळे आहेत. जुलै व ऑगस्ट महिन्यात जी अतिवृष्टी झाली त्या बाधित शेतकऱ्यांना १२८ कोटी ५५ लाख रुपयांची मदत जिल्ह्याला प्राप्त झाली असून या मदतीच्या वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून या अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असून काही पंचनामे अद्याप बाकी आहेत.
केवळ कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या खरिपातील पिकांचेच नुकसान अतिवृष्टीमुळे झाले नसून जिल्ह्यातील फळबागांनाही मोठा फटका बसला आहे तसेच भाजीपाला वर्गीय पिकांचीही मोठी हानी झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात ३ लाख ८१ हजार ४६१ शेतकऱ्यांच्या २ लाख ३७ हजार ३५१ हेक्टर वरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यातील २ लाख १२०० हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
गोदावरी, पूर्णा, दुधना या मोठ्या नद्यांसह जिल्ह्यातल्या सर्वच लहान नद्यांनाही पूर आल्याने पुराचे पाणी शेतात घुसले. परिणामी गंगाखेड, मानवत, परभणी, पालम, सोनपेठ, पूर्णा, पाथरी या तालुक्यांमध्ये खरीपाची पिके पाण्याखाली आली. काही भागात अजूनही पिकांमधले पाणी बाहेर पडलेले नाही. विशेषतः गोदावरी नदीच्या काठावरील जे तालुके आहेत त्यातल्या बहुतांश गावांमध्ये गोदावरीचे बॅक वॉटर अर्धा ते एक किलोमीटर पर्यंत शिवारात पसरल्याचे पाहायला मिळाले. सेलू तालुक्यात दुधा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीला फटका बसला.
पिकांच्या नुकसानीसह शेतकऱ्यांच्या शेतातल्या सुपीक जमिनीचा थर वाहून गेला असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही सर्वात मोठी हानी असल्याचे मानले जात आहे. केवळ काही मंडळांना अतिवृष्टीग्रस्त म्हणून ग्राह्य धरण्यापेक्षा सरसकट संपूर्ण जिल्ह्यातील मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावीत अशी मागणी शेतकऱ्यांकडून झाली. त्यानंतर आता हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी तसेच विविध पक्ष, संघटनांकडून होत आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होण्याआधी सर्व खात्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी तरच ही मदत खात्यात जमा होईल असे सुरुवातीला प्रशासनाच्या वतीने सांगितले गेले. त्यादृष्टीने बँकांनी शेतकऱ्यांकडून कागदपत्रे संकलित करणेही सुरू केले होते. तथापि आता केवायसीची अट शिथिल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची मदत जमा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.