Parinay Fuke शिवसेनेचा बाप मीच असं वक्तव्य भंडारा येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना परिणय फुके यांनी हे वक्तव्य केलं. ज्यानंतर आता महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. कारण परिणय फुकेंनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी शिवसेनेतील नेत्यांनी आणि मंत्र्यांनी केली आहे.

काय म्हणाले परिणय फुके?

परिणय फुके भंडाऱ्यातल्या मेळाव्यात म्हणाले, “काही लोकांनी माझ्यावर आरोप केले. पण मी माझ्यावर काही आरोप झाले त्यावर शांत बसलो. तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कुणी केलं? समजा पोरगा दहावीत पास झाला तर पोराने चांगलं केलं, आईने चांगलं केलं असं म्हणतात. काही खराब गोष्ट घडली तर म्हणतात हे बापाने केलं. त्या दिवशी मला हे पक्कं माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे. कारण ते खापर माझ्यावरच फोडत आहेत. या सगळ्या आरोपांकडे लक्ष न देता आपण आपलं काम ताकदीने सुरु ठेवलं पाहिजे आणि पक्ष वाढवण्याचं काम केलं पाहिजे. लोक आपला विरोध करत असतील तर आपण ते सगळ्यांपुढे सांगतो. आज मी इथे मान्य करतो आणि आभारही मानतो की मला विधान परिषदेवर नेण्याचं काम हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.” असं परिणय फुके म्हणाले. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

दीपक केसरकर काय म्हणाले?

एखाद्याच्या विधानाला पक्षाचं विधान म्हणून बघता कामा नये. परिणय फुके माझे मित्रच आहेत. पण लोकांची सेवा कशी होईल ते पाहिलं पाहिजे. दरम्यान परिणय फुकेंनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ही मागणी केली आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले?

परिणय फुके काय बोलले आणि कुठल्या शिवसेनेबाबत बोलले ते मला माहीत नाही. मला फार काही बोलायचं नाही असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.