Eknath Khadse On Parth Pawar Land Scam : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका जमीन खरेदी प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे चांगलेच अडचणीत आले आहेत. पार्थ पवार यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कोरेगाव पार्क येथील १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी आणि केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत आता आमदार एकनाथ खडसे यांनी एक मोठं विधान केलं. ‘कोरेगाव पार्कातील जमिनीची फाईल माझ्याकडे आली होती’, असं खडसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

“कोरेगाव पार्कातील त्या जमिनीची फाईल पूर्वी माझ्याकडे आली होती. त्यामध्ये त्या जमिनीच्या विक्रीसाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ती फाईल मी तपासली असता माझ्या लक्षात आलं की, त्याही आधी बाळासाहेब थोरात महसूलमंत्री असताना २०१३ मध्ये त्यांच्याकडे देखील तीच फाईल आलेली होती. तेव्हा बाळासाहेब थोरातांनी ही फाईल नाकारली होती”, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

“तेव्हा हे लोक उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयानेही जमिनीच्या विक्रीबाबत परवानगी दिली नव्हती. त्यानंतर अनेकांच्या माध्यमातून मला संपर्क करत माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण मी ती फाईल नाकारली होती”, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

“सरकारी जमीन खरेदी करणं हा फौजदारी गुन्हा आहे. तसेच ज्यांनी-ज्यांनी या व्यवहारात मदत केली, मग त्यामध्ये काही अधिकारी असतील, खरं तर हा संगनमताने केलेला व्यवहार, म्हणजे संगनमताने केलेला गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणात कठोर कारवाई झाली पाहिजे”, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.