पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी गरवारे कॉलेज ते आनंदनगर कोथरूड या दरम्यानच्या मेट्रोचे उदघाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी तिकीट काढून मुलांसोबत मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास केला. यावेळी त्यांनी काही शाळकरी मुलांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींना बघून आणि त्यांच्याशी बोलताना मुलांना खूप आनंद झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींनी मेट्रोमधील काही विद्यार्थ्यांनी तसेच शालेय गणवेश घालतेल्या मुलांशीही संवाद साधला. मेट्रोच्या प्रवासात मोदींनी सोबत असलेल्या मुलांचे फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटला शेअर केले आले आहेत. माझ्या तरुण मित्रांसोबत पुणे मेट्रो ट्रेनने प्रवास करत आहे, असे कॅप्शन यामध्ये लिहिले आहे. पंतप्रधानांनी गरवारे कॉलेज स्टेशन ते आनंद नगर स्टेशन असा मेट्रोचा प्रवास केला.

मोदींच्या मेट्रो रेल्वे प्रवासात त्यांच्या सोबत असलेली मुले शालेय गणवेशात असल्याने अनेकांनी रविवारीही शाळा सुरु असते का असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावरुन आता पंतप्रधान मोदींवर टीकाही होत आहे. रविवार असल्याने विद्यार्थी शाळेच्या गणवेशात कसे असा सवाल करत काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे. तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे.

“रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं) तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात?,” असे महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे.

पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. मात्र मोदींच्या या दौऱ्याला काँग्रेस, राष्ट्रवादीकडून तीव्र विरोध करण्यात आला. पुणे शहर काँग्रेसच्यावतीने शहरात ठिकठिकाणी गो बॅक मोदी असा मजकूर असलेले काळे फलक लावण्यात आले होते.

दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अखेर पुणेकरांसाठी मेट्रो सेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. उद्घाटनांतर पुणेकरांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. सहा मार्चला दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत पुणे आणि पिंपरीतील दोन्ही मार्गिकांवर मेट्रोची सेवा नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. तसेच सोमवारपासून पुणेकरांना दररोज सकाळी आठ ते रात्री नऊदरम्यान मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi travels pune metro train schools student abn