कोल्हापूरमध्ये शिक्षण संस्था व कौटुंबिक मालकी हक्कावरून बेछूट गोळीबार करणाऱ्या आरोपी मानसिंग विजय बोंद्रे याला शनिवारी (१५ जानेवारी) पोलिसांनी अटक केली. माजी मंत्र्याच्या या नातवाने शहरातील अंबाई टँक या भागात महिन्यापूर्वी बेछूट गोळीबार केला होता. अखेर आज त्याला रत्नागिरी येथून अटक करण्यात आली.
दसरा चौकातील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था व कौटुंबिक मालकी हक्कावरून मानसिंग बोंद्रे याने अंबाई टँक कॉलनी परिसरात मध्यरात्री गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी आरोपीचा सावत्र भाऊ अभिषेक बोंद्रे यांनी त्याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मानसिंग बोंद्रेने अटक कारवाई टाळण्यासाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात देखील धाव घेतली. मात्र, तेथेही त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. गोळीबाराच्या घटनेनंतर मानसिंग बोंद्रे पसार झाला होता. बोंद्रे याला न्यायालयासमोर हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.