लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या सांगलीच्या कुपवाड भागातील मंगलमूर्ती कॉलनीमधील वादग्रस्त प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तर जागेबाबत प्रांत कार्यालयामध्ये बैठक सुरु आहे.

गुढीपाडव्यानिमित्त मनसे नेते राज ठाकरे यांनी केलेल्या जाहीर भाषणात सांगलीच्या कुपवाड भागातील मंगलमूर्ती कॉलनी मधील अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस याठिकाणी मशीद बांधकामाच्या वादातून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला होता.या प्रकरणी संजय नगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते.

आणखी वाचा- माहीमच्या समुद्रातल्या ‘त्या’ बांधकामावर प्रशासनाकडून कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनंतर पालिकेचं मोठं पाऊल!

सदरच्या ठिकाणी महापालिकेचे शाळेचे आरक्षण असल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी या ठिकाणी या मशिदीला विरोध केला होता.त्यानंतर या ठिकाणी या दोन गटांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला होता. सदरची मशीद ही बेकायदेशीर बांधण्यात येत असून कोणतेही परवानगी नाही आणि सदर ठिकाणी महापालिकेच्या शाळेचं आरक्षण असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेला आहे, त्याचबरोबर या ठिकाणी बहुसंख्य हिंदू समाज असल्याने मशिद नको,अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी मांडली आहे.

या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाकडून परस्पर फिर्यादी दाखल करण्यात आल्या होत्या,त्यानुसार 15 जणांच्यावर गुन्हे दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे,आणि सध्या याठिकाणी शांततापूर्ण वातावरण असल्याचे संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी सांगितले.

दरम्यान वादग्रस्त जागा गुंठेवारी असून या ठिकाणी पत्र्याचे शेड उभे करुन चारही बाजूनी पत्र्यांनी बंदिस्त केले आहे. या जागेबाबत प्रांताधिकारी यांच्यासमोर बैठक सुरु असून महापालिकेच्या नगररचना विभागाने जागेवर येऊन मोजमापे घेतली आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police deployment at controversial place of worship in kupwad mrj