अहिल्यानगर : शहराच्या गंजबाजारातील कृष्णा टॉवरमधून पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून ११.७८ लाखांची बेहिशेबी रक्कम जप्त केली. दोघेही फलटणचे (सातारा) येथील रहिवासी आहेत. दोघांकडून रकमेबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्याने रोकड, नोटा मोजण्याचे यंत्र व ५ मोबाईल असा १२.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

रोहीत अशोक बोबडे (वय २९), आकाश अशोक बोबडे (वय २७, दोघे रा. घाडगेवाडी, फलटण, सातारा) अशी दोघांची नावे आहेत. अंमलदार मल्लिकार्जुन कैलास बनकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन व्यक्ती बेकायदा रोख रक्कम घेऊन गंजबाजार येथे येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक घार्गे यांना मिळाली होती. त्यांनी विशेष पथक तयार करून सापळा रचला.

संशयित दोघे दिसताच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील बॅगची तपासणी करण्यात आली. त्यात ११ लाख ७८ हजार ४०० रुपयांची रोकड आढळली. या रकमेबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने दोघांना ताब्यात घेऊन रक्कम जमा करण्यात आली. अधिक तपास कोतवाली पोलिस करत आहेत.