सावंतवाडी : सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील जिल्हा मुख्यालय रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका महिला सरकारी अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ओरोस येथील डॉन बॉस्को शाळेसमोर घडली. हेमलता धोंडू कुडाळकर (रा. कुडाळ) असे या मृत महिलेचे नाव असून, त्या सिंधुदुर्गनगरी येथे सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्या कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या भगिनी होत्या.
हेमलता कुडाळकर या जिल्हा परिषदेच्या लेखा आणि कोषागार कार्यालयात काम करत होत्या. पतपेढीतील काम आटोपून त्या दुचाकीवरून परत येत असताना हा अपघात झाला. डॉन बॉस्कोसमोरच्या रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली. त्यामुळे मागे बसलेल्या हेमलता कुडाळकर रस्त्यावर फेकल्या गेल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची बातमी कळताच सिंधुदुर्गनगरी येथील सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्या सर्वांच्या परिचयाच्या होत्या. या घटनेनंतर सिंधुदुर्गनगरी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
जिल्हाधिकारी आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांचा नियमित वावर असलेल्या जिल्हा मुख्यालय रस्त्यावर हा अपघात घडला. पालकमंत्री नितेश राणेही येथे नेहमी येत असतात. अशा ठिकाणी खड्ड्यांमुळे एका सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू होणे, हे जिल्हा प्रशासनाला शोभादायक नाही, अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर व्यक्त केली जात आहे.