मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आगामी निवडणुकीसाठी युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमच्यात युती झालेली असून फक्त ते जाहीरपणे सांगणे बाकी आहे, असे वंचित बहूजन आघाडीकडून सांगितले जात आहे. असे असतानाच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या दोन नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली. दरम्यान, या भेटीनंतर राज्यात नवे राजकीय समीकरण रुजणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. या दोन नेत्यांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली? हेदेखील विचारण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत सविस्तर सांगितले आहे. ते आज (१२ जानेवारी) प्रसार माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘धर्मवीर’ वादावर बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली! अमोल कोल्हेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले “दाढी काढल्यावर त्याला…”

“एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे भेट होणारच आहे. मात्र प्रत्येक भेट राजकीयच असते, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपाची साथ सोडली तरच त्यांच्याशी राजकीय चर्चा होऊ शकते, अन्यथा आमच्यात चर्चा होऊ शकत नाहीत. आम्ही मागील ३५ वर्षांपासून राजकारणात आहोत. आमचे राष्ट्रावादी, काँग्रेसमुळे नुकसान झाले. मात्र तरीदेखील आम्ही भाजपासोबत गेलो नाहीत. त्यावेळी आम्ही भाजपासोबत गेलो असतो तर तेव्हाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे फार मोठे नुकसान करू शकलो असतो. मला माझी ताकद माहिती आहे. मला माझ्या पक्षाची ताकदही माहिती आहे,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा >>> “भारतातील ‘ही’ दोन खोकल्याची औषधं लहान मुलांना देऊ नका”, १९ मृत्यूनंतर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

बैठकीत काय चर्चा झाली?

“मी एकनाथ शिंदे यांची इंदू मीलमधील स्मारकाबाबत भेट घेतली. नोएडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतीकृती तयार केली जाते. ही प्रतिकृती पाहण्यासाठी सरकारने एक टीम पाठवली होती. या टीममधील सदस्यांनी वेगवेगळे मत नोंदवले. त्यामुळे मी जेव्हा दिल्लीला जाईल तेव्हा नोएडा येथे मी प्रतकृतीला भेट देणार आहे. याबाबत या बैठकीत चर्चा झाली,” अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

हेही वाचा >>>‘धर्मवीर’ वादावर बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली! अमोल कोल्हेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले “दाढी काढल्यावर त्याला…”

भाजपा-आरएसएस यांच्यासोबत व्यवस्थेचं भांडण

“आमची अनेक विषयांवर चर्चा झाली. मात्र आगामी निवडणुका शिवसेनेसोबत (उद्धव ठाकरे गट) लढवायच्या अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनदेखील माहिती आहे. भाजपा ज्या-ज्या पक्षांसोबत आहे, त्या-त्या पक्षांसोबत आम्ही कधीही गेलेलो नाहीत, हेही शिंदे यांना माहिती आहे. आमचं भाजपा-आरएसएस यांच्यासोबत व्यवस्थेचं भांडण आहे. ज्या व्यवस्थेला आम्ही उद्ध्वस्त केलं, तीच व्यवस्था भाजपा आणू पाहतेय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपा तसेच भाजपाच्या मित्रपक्षांसोबत तडजोड केली जाणार नाही हे स्पष्ट आहे,” असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar comment on meeting with eknath shinde said will not form alliance with eknath shinde group prd