Prakash Ambedkar on Uddhav Thackeray Maratha Reservation Statement : राज्यात आरक्षणासाठी लढणाऱ्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींकडे जाऊन आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी करावी, अशी भूमिका मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. त्यांच्या या भूमिकेवर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका दुर्दैवी असे ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या समाज माध्यमावर व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भात भाष्य केलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे यांच्या मागणीबाबत उद्धव ठाकरेंनी मांडलेली भूमिका अतिशय दुर्दैवी आहे. मुळात उद्धव ठाकरे यांनी आपण या मागणीच्या बाजुने आहोत की विरोधात हे स्पष्ट न करता, पंतप्रधान मोदींकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. याचा अर्थ ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी मोदींकडे जा, असं उद्धव ठाकरे सूचवत आहेत”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
“हा भांडण मिटवण्याऐवजी भांडणं लावण्याचा प्रकार”
पुढे बोलताना, “उद्धव ठाकरेंची ही भूमिका दोन समाजातील भांडण मिटवण्याऐवजी भांडणं लावण्याचा प्रकार आहे. यामुळे महाराष्ट्रातील शांतता भंग होऊ शकते”, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं होतं?
उद्धव ठाकरेंनी मंगळवारी मातोश्री या त्यांच्या निवास्थानी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. यादरम्यान त्यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यााबाबत तुमची भूमिका काय? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यासंदर्भात बोलताना, आरक्षणाच्याबाबतीत राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा, सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं आणि सर्वमान्य तोडगा काढावा. शिवसेनेचा ( उद्धव ठाकरे गट ) त्याला पाठिंबा असेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
याशियाय “आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकार सोडवू शकत नाही. त्यामुळे सर्वच समाजाला पंतप्रधान मोदींकडे हा प्रश्न मांडावा लागेल. मी सर्व समाजाच्या लोकांना विनंती करतो, की त्यांनी राज्यात आरक्षणासाठी भांडण केल्यापेक्षा दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना यात लक्ष घालण्याची विनंती करावी, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.
© IE Online Media Services (P) Ltd