विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर भारताचे दोन तुकडे झाले असते,” असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं होतं. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वडेट्टीवारांना सुनावलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात डोक्यात मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा विचार आला असता, तर या भारताचे दोन तुकडे करावे लागले असते. आज दिल्लीत बसलेल्या लोकांनी हा विचार केला पाहिजे,” असं वडेट्टीवारांनी म्हटलं.

“वडेट्टीवारांना खुर्चीवर बसवणाऱ्यांची कीव येते”

यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “बिनडोक लोक खुर्चीवर बसतात, तेव्हा अशी विधानं केली जातात. खुर्चीवर बसलेल्यांचा नाहीतर, तर त्यांना बसवणाऱ्यांचा दोष आहे. जेवढी समज वडेट्टीवारांना आहे, तेवढेच ते बोलतात. त्यामुळे त्यांना खुर्चीवर बसवणाऱ्यांची मला कीव येते.”

“मी तो मुद्दा त्यावेळच्या परिस्थितीत नाही, तर…”

दरम्यान, वडेट्टीवारांनी केलेल्या विधानानंतर विरोधकांकडून त्यावर टीका झाली. यानंतर वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये, असं आवाहन वडेट्टीवारांनी केलं. “त्या भाषणात मी जो मुद्दा मांडला तो त्यावेळीही अनेक वक्त्यांनी मुद्दा मांडला होता. अनेक साहित्यिकांनीही हा मुद्दा मांडला होता. मी तो मुद्दा त्यावेळच्या परिस्थितीत नाही, तर आजच्या परिस्थितीत मांडला. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर देशाचे दोन तुकडे झाले असते. कारण धर्माधर्मात विष पेरणारी माणसं आज देशात राज्यकर्ते झाले आहेत,” असं वडेट्टीवारांनी म्हटलं.

“राज्यकर्ते हिंदू-मुस्लिमांना एकमेकांविरोधात लढवत आहे”

“दिल्लीत काय चाललं आहे. तेथे हिंदू मुस्लीम यांना एकमेकांविरोधात लढवलं जात आहे. त्यामुळे आज डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर देशाची काय परिस्थिती झाली असती. या आजच्या परिस्थितीनुसार मी ते वक्तव्य केलं आहे. त्याचा अर्थ आज डॉ. आंबेडकर असते आणि त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर देशाचे दोन तुकडे झाले असते. त्याला आजचे राज्यकर्ते जबाबदार असते,” असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.

“देशात जाती-धर्मात विष पेरण्याचं काम सुरू”

“देशात जाती-धर्मात विष पेरण्याचं काम सुरू आहे. तो कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नव्हता, तर बुद्ध मूर्ती वितरणाचा होता. आपण बुद्धांच्या मार्गावर चाललो, तर देश आणि जग शांततेच्या मार्गावर चालेल. डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करताना ती स्पष्ट भूमिका मांडली होती,” असंही वडेट्टीवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar slam vijay wadettiwar over dr babasaheb ambedkar muslim comment ssa