मुंबईतील शिवजी पार्कवर शिवसेनेकडून भव्य दसरा मेळावा आयोजित केला जातो. त्यासाठी दरवर्षी राज्यातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होत असतात. ही परंपरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून चालत आलेली आहे. मात्र आता शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यामुळे यावर्षीच्या दसरा मेळाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये चढाओढ लागली आहे. असे असताना भाजपाचे खासदार प्रसाद लाड यांनी खरी शिवसेना कोणाची? तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे मत जनतेचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. त्यामुळे जनतेला शिंदे यांच्या दसरा मेळाव्यामध्येच विचारांचे सोने लुटायला आवडेल, असे लाड म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> “वाघ हा वाघच असतो, त्याने डरकाळी फोडली अन्…” दीपक केसरकरांचे उद्धव ठाकरेंना जशास तसे उत्तर

खरी शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात आहे. परंतु निवडून आलेले लोकप्रतिनिधी, संघटनात्मक प्रतिनिधी तसेच देशातील ८ राज्यांनी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे म्हणत पाठिंबा दिला आहे. आम्ही आता न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. जनतेच्या मनातील आणि बाळासाहेबठाकरे यांनी निर्माण केलेली खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, अशी भूमिका प्रसाद लाड यांनी मांडली.

हेही वाचा >> “राज्यात पैशांनी सत्तांतर झालं, सिद्ध केलं नाही तर विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही”

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही प्रसाद लाड यांनी भाष्य केले. देशातील तसेच राज्यातील जनतेला एकनाथ शिंदे गटाची शिवसेनाच खरी असल्याचे वाटते. त्यामुळे जनतेला एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटायला निश्चित आवडेल, असेही प्रसाद लाड म्हणाले.

हेही वाचा >> “पहिल्या यादीत माझे नाव होते, पण ऐनवेळी…” मंत्रीमंडळ विस्तारावर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांचे महत्त्वाचे विधान

दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटांनी महानगरपालिकेत अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही गटांकडून बीकेसी मैदानावरही दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी, म्हणून अर्ज दाखल केले होते. यावर महापालिकेनं निर्णय घेतला असून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला परवानगी दिली आहे. शिंदे गटाने अगोदर अर्ज दाखल केल्यामुळे, त्यांना पहिल्यांदा परवानगी देण्यात आल्याचा निकष महापालिकेनं लावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prasad lad comment on dussehra melava eknath shinde group is real shivsena prd