GPS, CCTV In All ST Buses: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असून, त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षिस जाही करण्यात आले आहे. पुण्यात घडलेल्या या घटनेनंतर एसटी प्रवास करताना महिलांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, महिला प्रवाशांमध्येही या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात एस.टी महामंडळाची महत्त्वाची बैठक आज मंत्रालय येथे पार पडली. या बैठकीनंतर महिला प्रवशांच्या सुरक्षितेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस अनिवार्य

मंत्रालयात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “आमच्या सर्व लाडक्या बहिणींना परिवहन मंत्री म्हणून मी आवाहन करतो की, घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात कुठेच अशी घटना घडता कामा नये. लाडक्या बहिनींना परिवहन मंत्री म्हणून माझी विनंती आहे की, तुम्ही पूर्वी ज्या पद्धतीने एसटी प्रवास करत होता तसाच तुमचा प्रवास सुरू ठेवा. प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आम्ही आजच्या बैठकीत सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम बसवण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर पुढील काळात एसटी बसेस आणि स्थानकांवर एआयचा वापरही करण्यात येणार आहे.”

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

  • सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस अनिवार्य करणार
  • सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार
  • सर्व बस डेपोचे ऑडिट करण्यात येणार
  • परिवहन विभागात आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय
  • एसटी आगारातील भंगार वाहने १५ एप्रिल पर्यंत हटवण्यात येणार
  • शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल
  • बस डेपोत स्वच्छतेला प्राधान्य देणार

आरोपी अद्यापही फरार

पुण्यातील बलात्कार प्रकरणातील आरोप आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (३७) याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी १३ पथकांची स्थापना केली आहे. मंगळवारी सकाळी घडलेल्या घटनेपासून तो फरार आहे. याचबरोबर त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीटीआयला दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratap sarnaik orders gps and cctv installation in all st buses after pune incident aam