Pratap Sarnaik Letter to Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा शिकण्याची सक्ती केली होती. तसेच सरकारने त्रिभाषा सूत्र स्वीकारलं होतं. मात्र, राज्यातील मराठी जनतेने या निर्णयाचा विरोध केला. तसेच शिवसेना (ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याविरोधात मोर्चाची हाक दिली होती. शनिवारी (५ जुलै) हा मोर्चा काढला जाणार होता. मात्र, जनतेचा रोष पाहून फडणवीस सरकारने दोन्ही शासन निर्णय मागे घेतले. परिणामी शिवसेना (ठाकरे) व मनसे या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी आंदोलनाच्या दिवशी विजयी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. मुंबईतील वरळी येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत मोठा मेळावा पार पडला. त्यावरून शिवसेना (शिंदे) नेते व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

या पत्रात म्हटलं आहे की “शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची विजयी वाटचाल चालू आहे आणि आपण मुख्यमंत्री असताना आपल्या संकल्पनेतून चालू झालेल्या अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राज्यात चालू आहेत. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत मोठ्या उंचीवर जात आहे. पण आपल्या राज्यात, गेले काही दिवस मराठी भाषेचे निमित्त करुन स्वार्थी राजकारण पुन्हा एकदा सुरू झाले आहे, त्याबाबत माझ्या भावना पत्रातून व्यक्त केल्या आहेत. मला माझ्या भावना या पत्रातून व्यक्त कराव्याशा वाटल्या.”

“उबाठा गटाने आजवर मुंबईचा नव्हे तर केवळ स्वतःचा विकास केला”, सरनाईकांचा टोला

प्रताप सरनाईक म्हणाले, “मराठीच्या हितासाठी आम्ही एकत्र येत आहोत असे उबाठा गट, मनसे सांगत आहेत. मग काही वर्षांपूर्वी हे लोकं वेगळे कोणाच्या हितासाठी झाले होते? मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती यांच्याविषयी त्यांना काडीचे प्रेम नाही, केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून ही मंडळी एकत्र येत आहेत हे सुज्ञ जनता ओळखून आहे. राक्षसाचा जीव पोपटात असतो अशी एक लोककथा मराठीत आहे. यांचा जीव महापालिकेत अडकलेला आहे. महापालिकेच्या तिजोरीत यांचा आत्मा आहे. शनिवारी वरळी येथे झालेल्या मेळाव्यात त्यांचा स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडाच पहायला मिळाला. सत्ता गेल्यामुळे ते किती अगतfक झाले आहेत याची प्रचिती उभ्या महाराष्ट्राला पदोपदी येत आहे. उबाठाचे राजकारण अत्यंत खोटारडे, स्वार्थी आणि विश्वासघातकी आहे. त्यामुळेच त्यांचा एक एक सहकारी त्यांना सोडून जात आहे.

प्रताप सरनाईक काय म्हणाले?

“मराठीची टोपी घालून, अनेक वर्षे उबाठा गटाने मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगली. परंतु, त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचेच काम केले. त्यांच्या या टोपीखाली दडलंय काय? तर केवळ स्वार्थ आणि अप्पलपोटेपणा दडलेला आहे. कोव्हिड रुग्णांची खिचडी खाऊन गब्बर झालेली ही मंडळी मिठी नदीतील भ्रष्टाचाराच्या गाळात खोलवर अडकून पडली आहे. मराठी भाषेचे कैवारी किंवा ठेकेदार असल्याचा आव आणणाऱ्यांनी मराठीचे जेवढे नुकसान केले तेवढे कुणीच केले नसेल. गेली अनेक वर्षे फक्त भाषेच्या मुद्यावर राजकारण करणाऱ्यांनी ‘मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार’, ‘मुंबई तोडण्याचा डाव’ असा अपप्रचार करून वर्षानुवर्षे लोकांची मते लाटली. प्रत्यक्षात मुंबईचा नाही तर फक्त स्वतःचाच विकास उबाठाने केला. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणीच करणार नाही हे यांना चांगलेच माहिती आहे, तरीही ते दरवेळी बागुलबुवा उभा करतात. ‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’ असा हा प्रकार आहे. लोकांना खोटी भीती दाखवयाची आणि स्वतः गब्बर व्हायचे, असे यांचे धोरण आहे.”

“आयुष्यभर मराठीवर राजकारण करणारे हे नेते मुंबईत एवढी वर्षे सत्ता असून मराठी शाळा वाचवू शकले नाहीत. उलट उबाठाच्या काळात महापालिकेच्या मराठी शाळांचे रूपांतर इंग्रजी शाळांमध्ये करण्यात आले आणि मराठीला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. दुकानांवरच्या पाट्या मराठीत लावाव्यात म्हणून आंदोलन करणाऱ्यांच्या मुलांच्या साखरपुड्याच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका इंग्रजित छापल्या जातात हे सगळ्यांनीच उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे.”

“मुंबईतील गिरणी कामगार देशोधडीला लागला… तो कोणामुळे? मराठी माणुस मुंबई सोडून विरार, नालासोपारा, बदलापूरला शिफ्ट झाला, तो कोणामुळे? मतांची भीक मागण्यासाठी इतर भाषिकांचे मेळावे कोणी घेतले? तिसरी भाषा शिकविण्याचा प्रस्ताव कोणाच्या सत्तेच्या काळात आला हेही लोक जाणून आहेत. मराठी माणसाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी, मराठीचा झेंडा चहू दिशांनी फडकावा असे आपल्याला प्रत्येकाला वाटते. पण उबाठाचे पक्षावर एकहाती वर्चस्व असतानाच मुंबईतील हॉटेल इंडस्ट्री, बांधकाम व्यवसाय, सोन्या चांदीची दुकाने यासह प्रत्येक क्षेत्रात, उद्योग व्यवसायातून मराठी माणूस हद्दपार होत गेला. भाषेचे राजकारण करणाऱ्यांनी लोकांच्या विकासाचा विचार कधीच केला नाही. चाकरमानी हे आपले चाकर आहेत अशाच भ्रमात ते राहिले. अनेक वर्षे उबाठाची सत्ता महापालिकेत होती, तेव्हा त्यांनी यासाठी काय केले? यावर एक पश्चाताप मेळावा घेऊन उबाठाने जनतेला माहिती दिली पाहिजे.”

“मराठीचा मुद्दा घेऊन राज ठाकरेंनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली त्याला आता १९ वर्षे झाली! मराठीची परिस्थिती तीच आहे उलट अजुन बिकटच झाली आहे! ज्या बडव्यांच्या नावाने छाती बडवून राज ठाकरे रुसून घराबाहेर पडले होते, त्याच बडव्यांच्या कडेवर आज ते बसत आहेत. त्यामागे कोणते राजकारण आहे हे न कळण्याइतकी महाराष्ट्रातील जनता दुधखूळी नक्कीच नाही. आपल्या भाषणाला टाळ्या पडतात परतुं, मते पडत नाहीत ती का, याचा विचार करुन ते थकले आणि बडव्यांना शरण गेले, असे आम्ही म्हणायचे का? मराठी माणसांबद्दल एवढे प्रेम होते तर का नाही उबाठा आणि मनसेच्या प्रमुखांनी मराठी तरुणांना व्यवसायात उतरण्यासाठी मार्गदर्शन केले? स्थानिय लोकाधिकार समिती पुन्हा एकदा जोरात कार्यरत का नाही केली? मराठी तरुणांनी रस्त्यावर उतरायचे, फक्त आंदोलने करायची आणि यांनी वातानूकुलित खोलीत बसून खिडकीतून मजा पाहायची, हेच यांचे मराठी प्रेम आहे.”

“मुळात वास्तव हे आहे की मराठी तरुण कामधंद्याला लागणं हे उबाठा आणि मनसे या दोन्ही पक्षांना परवडणारं नाही. मराठी तरुणांच्या हातांना काम मिळालं तर यांची दुकानं बदं होतील. आजचा मराठी तरुण नक्की करतोय काय? त्याला काय हवे आहे याच्याशी या नेत्यांना देणे घेणे उरलेले नाही आणि कधीही देणे घेणे नव्हते. मराठी तरुणांची माथी भडकावून, त्यांचा वापर करुन, या दोन पक्षाचे नेते आपले स्वतःचे दुकान चालवत आहेत. या दुकांनाचे शटर बंद व्हायची वेळ आली म्हणून हे पुन्हा एकत्र येत आहेत. यांचे मराठी प्रेम हे पुतना मावशीचे मराठी प्रेम आहे. यांना फुटलेला मराठी प्रेमाचा पान्हा हा स्वार्थाच्या वीषाचा आहे. आपली अमृताहून गोड मराठी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली गेली पाहिजे, मराठी भाषेचा जागर झालाच पाहिजे आणि हा जागर होणारच. पण त्याचा स्वतःच्या राजकारणासाठी, स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग करणे योग्य नाही. एकमेकांना ज्यांनी गेली दोन दशके सतत पाण्यात पाहिले ते आता एकमेकांना मंचावर शेजारी शेजारी पाहात आहेत तेव्हा ते मनात एकमेकांची उणी दुणी काढत असतील. एकमेकांना सोबत घेऊन भाषेचे राजकारण करण्याशिवाय काही पर्याय त्यांच्याकडे उरलेला नाही!”

उबाठा गटाने किती नवे मराठी उद्योजक उभे केले? सरनाईकांचा प्रश्न

प्रताप सरनाईक म्हणाले, “मुंबईतील मराठी माणसाच्या मनात आज काही प्रश्न आहेत. मराठी-मराठी करून अनेक पिढ्या बसून खातील, एवढी माया उबाठा गटाच्या लोकांनी गोळा केली त्याच काळात बहुसंख्य मराठी माणूस गाठोडे काखेत घेऊन मुंबईतून हद्दपार होत होता. तेव्हा यांनी डोळे बंद केले होते का? मुंबईत सत्ता उपभोगली त्यांनी मुंबईसाठी काय केले? त्यांच्या सत्ता काळात किती मराठी तरुणांना व्यावसायिक बनवले? व्यवसाय रोजगारासाठी किती लोकांना मार्गदर्शन केले? किती लोकांच्या आयुष्याला दिशा दिली? यांच्या बेगडी भाषा प्रेमाला, स्वार्थी राजकारणाला आणि खोटारडेपणाला मुंबईची जनता कंटाळली आहे. सर्वसामान्य मुंबईकर विकासाच्या राजकारणाला साथ देत आहे.”