परभणी : अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेले सोयाबीन व कापूस आता बाजारात येत असून या दोन्ही प्रमुख नगदी पिकांची खरेदी सध्या हमीभावापेक्षाही कमी दराने होत आहे. सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ३२८ रुपये असताना बाजारात खासगी व्यापाऱ्यांकडून ४ हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा कमी दराने ही खरेदी सुरू आहे तर कापसाचा हमीभाव ८ हजार रुपये प्रति क्विंटल असताना कापसाची खासगी खरेदी क्विंटलला सात हजार रुपयांवरच रेंगाळली आहे.

यावर्षी अतिवृष्टीचा सोयाबीनला मोठा फटका बसलेला आहे. उत्पादकतेवर तर अतिवृष्टीचा परिणाम झालाच पण शेतमालाच्या गुणवत्तेवरही झाला आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आले असताना शासनाच्या खरेदीचे मात्र अजून कोणतेच धोरण निश्चित नाही. ३० ऑक्टोबरपर्यंत शासकीय हमीभावात सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू होतील असे सरकारच्या वतीने सांगितले जात असले तरी अजूनपर्यंत यासंदर्भात कोणत्याही सूचना संबंधितांना नाहीत. त्यातच सुरुवातीला नोंदणी आणि त्यानंतर खरेदी असा प्रकार होत असल्याने सध्या अडलेले शेतकरी मिळेल त्या किमतीत सोयाबीन विकून मोकळे होत आहेत.

जिल्ह्यातील अकरा बाजार समित्यांमध्ये या हंगामातील सोयाबीनची खरेदी होत असून कुठेच ती हमीभावाने होत नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या प्रकारावर जिल्हा उपनिबंधकांचे कोणतेही नियंत्रण नाही. परिणामी क्विंटलमागे शेतकऱ्यांना दीड हजार रुपयांचा फटका सोयाबीन या पिकात सहन करावा लागत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक अडचण दूर करण्यासाठी मिळेल त्या दरात सोयाबीन विकावे लागले आहे.

दुसरीकडे बाजारात शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी आला असून कापसाची खरेदी खासगी बाजारात सात हजार ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटलने होत आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर खासगी कापूस खरेदीला प्रारंभ झाला असून सात हजार २०० रुपये या भावाने कापसाची खरेदी सुरू झाली. अतिवृष्टीचा फटका कापसाला बसल्याने कापसाच्या गुणवत्तेवरही त्याचा परिणाम झाला आहे. कापूस भिजल्याने काही ठिकाणी तो पिवळसर दिसत असून व्यापाऱ्यांनी असा कापूस कमी दरात घेणे सुरू केले आहे. राज्य सरकारचे कापूस खरेदीबाबत कोणतेही धोरण ठरले नाही तर अजून ‘सीसीआय’ची खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत. जिल्ह्यात सर्वत्र महत्त्वाच्या ठिकाणी ‘सीसीआय’ची कापूस खरेदी न होता ती विशिष्ट ठिकाणी होत आहे. कापूस खरेदीत व्यापाऱ्यांची मनमानी शेतकऱ्यांना सहन करावी लागत आहे. सध्या कापूस व सोयाबीन या दोन प्रमुख नगदी पिकांची आवक सुरू झाली असून दोन्ही पिकांना बाजारपेठेत हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अक्षरशः लूट होत आहे.