अलिबाग : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीने एका महिलेची हत्या केली. ही घटना अलिबाग तालुक्यातील महाजने येथील दिवीवाडी इथं सोमवारी घडली. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना चंद्रकांत नाईक असे मृत महिलेचे नाव असून, दत्ताराम नागु पिंगळा असे या आरोपीचे नाव आहे. या दोघांचे प्रेमसंबंध होते.
परंतु, अर्चनाच्या काकांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. त्यांनी चंद्रकांत नाईक यांच्यासोबत अर्चनाचे काही वर्षांपूर्वी लग्न लावून दिले होते. या गोष्टीचा राग मनात धरून दत्ताराम नागू पिंगळा याने २८ मार्च २०१८ रोजी तुकराम सजन्या नाईक यांच्या डोक्यावर आणि पाठीमागे धारदार हत्याराने मारहाण करून दुखापत करून त्यांना गंभीर जखमी केलं होतो.
तुकाराम सजन्या नाईक यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना ३१ मार्च २०१८ रोजी त्यांचं निधन झालं. त्यामुळे आरोपी दत्ताराम नागू पिंगळा याला सदर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. दरम्यान, या गोष्टीचा राग दत्ताराम पिंगळा याच्या मनात होता. आरोपी दत्ताराम हा कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. अर्चनाला भेटण्यासाठी सोमवारी (दि.1) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आदिवासीवाडीमधील तिच्या घरी गेला. त्यावेळी दोघांचे शाब्दीक वाद झाले.
हा वाद विकोपाला पोहचला. त्याने रागाच्या भरात तिचा दोरीने गळा आवळून तिला ठार केली. त्यानंतर तो तेथून पसार झाला. या घटनेची माहिती रेवदंडा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन मारेकऱ्याचा शोध सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकासह श्वान पथकाने तपासाची सुत्रे वेगाने हालवली. अखेर आदिवासीवाडीपासून काही अंतरावर असलेल्या जंगल भागात लपून बसलेल्या दत्ताराम पिंगळा याला पोलिसांनी अवघ्या तीन तासात अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.