Pune Bus Rape Case : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बलात्कार झाला. बलात्कारानंतर हा आरोपी जवळपास तीन दिवस पोलिसांना चकवा देत होता. अखेर सीसीटीव्ही फुटेज, श्वान पथक आणि ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपीला गुणाट या गावातून मध्यरात्री अटक केली. यानंतर आरोपीला आज पुणे सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दरम्यान या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आरोपीला पुणे न्यायालयाने १२ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वारगेट बसस्थानकात महिलेवर अत्याचार झाल्याची घटना उजेडात आल्यानंतर याविरोधात सर्व स्तरांमधून संताप व्यक्त केला जात होता. विरोधकांकडून राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर टीका केली जात होती. या दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी काय सांगितले?

“एसटी स्थानकातील २३ सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्थानकाबाहेरील ४८ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दीड ते दोन तासांत आम्ही आरोपीची ओळख पटवली होती. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही आरोपीच्या गावात जावून शोधमोहिम घेत होतो. पण आरोपी तेव्हा सापडला नाही. अखेर तो आज सापडला आहे. याकरता मी गावातील नागरिकांचे धन्यवाद देतो. त्या गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत. तिथे ज्या-ज्या लोकांनी मदत केली, त्यांचं विशेष अभिनंदन करणार आहोत”, असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार भावना आरोपीच्या अटकेनंतर व्यक्त केली.

“शेवटच्या माहितीवरून आम्ही आरोपीला पकडलं. शेवटची माहिती आली की तो कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता. तो कोणालातरी दिसला आणि मग तो तिथून पळाला. ड्रोनच्या सहाय्याने जी दिशा दिसली, त्यातून त्याला अटक करण्यात आली. ज्याने शेवटची माहिती दिली, त्याला एक लाखांचं बक्षिस देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त गावासाठी काय करता येणार, याचाही आम्ही विचार करणार आहोत”, असेही अमितेश कुमार यावेळी म्हणाले.

आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न

पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “असं आहे की या प्रकरणातील सर्व गोष्टी तपासात समोर आल्यानंतर त्यावर सविस्तर बोलणं योग्य आहे. आता पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे. त्यानंतर आरोपीला आज न्यायालयात हजर केलं जाईल. त्यानंतर आरोपीची चौकशी होईल. तसेच काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेल्या आहेत. तसेच काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेल्या आहेत. याची सर्व माहिती एकत्र करून याबाबत बोलणं योग्य राहील.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune bus rape case court granted 12 days of police custody for accused for further investigation marathi news rak