Rahul Narwekar Speaker of the Maharashtra Legislative Assembly : शिवसेनेने (ठाकरे) राज्यातील महायुती सरकारमध्ये लवकरच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. पक्षाच्या ‘सामना’ या मुखपत्रात यासंबंधीची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते, तर विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद मिळू शकतं. यावर नार्वेकर यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी माध्यमांच्या अहवालांवर विश्वास ठेवत नाही, मी फक्त पक्ष नेतृत्त्वावर विश्वास ठेवतो. आमचं पक्ष नेतृत्व सध्या दिल्लीत आहे, योग्य ठिकाणी आहे.”

राहुल नार्वेकरांनाच मंत्रिपदाची अपेक्षा होती, असं म्हटलं जात आहे. या चर्चेवर नार्वेकर म्हणाले, “विधानसभेचं अध्यक्षपद हे मंत्रिपदापेक्षा श्रेष्ठ असतं. त्यामुळे अध्यक्षपद जाऊन मंत्रिपद मिळालं तर त्याचा आनंद कसा होईल? तरीदेखील पक्षातील वरिष्ठ नेते देतील ती जबाबदारी पार पाडायला मी तयार आहे. विधानसभेचे अध्यक्षपद असेल, मंत्रिपद असेल किंवा आमदार म्हणून मला काम दिलेलं असेल, प्रत्येक काम मी योग्यरित्या पार पाडेन. मला लोकांची कामं करायची आहेत, जनतेची कामं करायची आहेत. त्यामुळे मिळतील त्या भूमिका मी पार पाडेन.” नार्वेकर एबीपी माझाशी बोलत होते.

दुसरी जबाबदारी मिळाली तरी ती पार पाडेन : नार्वेकर

राहुल नार्वेकर म्हणाले, मला विधानसभेचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या विधानसभेचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. आत्ता झालेल्या अधिवेशनात आम्ही १५२ लक्षवेधी चर्चेला घेतल्या होत्या. आम्ही आमदारांना प्रशिक्षण देतोय, विधानसभेची कार्यक्षमता वाढताना दिसतेय आणि हे सगळं जनतेच्या हिताचंच आहे. अध्यक्ष म्हणून मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या (प्रसारमाध्यमं व जनता) आशीर्वादाने मला इतर कुठली जबाबदारी मिळाली तर मी ती देखील पार पाडेन.”

मंत्रिपद असो अथवा विधानसभेचं अध्यक्षपद असो, पक्षाचं नेतृत्व याबाबतचे निर्णय घेत असतं. मला आतापर्यंत दिलेल्या जबाबदाऱ्या सांभाळून मी संतुष्ट आहे. मी आतापर्यंत सर्वांना न्याय देऊ शकलो, विधानसभेच्या कामकाजाचा दर्जा उंचावण्याची संधी मला मिळाली, विधानसभेतील कामकाज आता वाढलं आहे. मुंबई असो किंवा नागपूर असो, दोन्ही विधान भवनांचा चेहरामोहरा मला बदलता आला याचं मला समाधान आहे. आम्ही आता विधानसभेचं कामकाज डिजिटल करत आहोत. संपूर्ण काम पेपरलेस होईल. अशा अनेक क्रांतिकारी गोष्टी आम्ही केल्या, याचा मला आनंद आहे आणि यापुढे मला मिळेल त्या प्रत्येक जबाबदारीसाठी मी तयार असेन.”