अलिबाग- अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ लाखांची लाच मागणाऱ्या पोलीसाला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे. विशाल वाघाटे असे अटक करण्यात आलेल्या पोलीसाचे नाव आहे.
३० वर्षीय तक्रारदारा विरोधात पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. हा गुन्हात योग्यती मदत करण्यासाठी तसेच पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा न दाखल करण्यासाठी विशाल वाघाटे नेमणूक पोलीस मुख्यालय अलिबाग याने तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ८ ऑक्टोबरला प्राप्त झाली. ९ ऑक्टोबरला या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. ज्यात आरोपी पोलीस वाघाटे यांनी लाचेची मागणी केल्याचे आणि पहिल्या हप्त्यात तीन लाख रुपये स्विकारण्याचे कबूल केले.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला, आणि आज सकाळी (१० ऑक्टोबरला) काळी ३ लाख रुपयांची लाच घेतांना वाघाटे यांना रंगेहाथ पकडले. महाड शहर पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती रायगडच्या लाच लुचपत विभागाच्या प्रमुख पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांनी दिली. या कारवाईत पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, नारायण सरोदे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, अरुण करकरे, सुषमा राऊळ, पोलीस हवालदार महेश पाटील, सुमित पाटील, परम ठाकूर, सिचन आटपाडकर, पोलीस शिपाई मोनाली पाटील, अनंत घरत, सागर पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांचे एजंट लाचेची मागणी करत असल्यास तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी ०२१४१- २२२३३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उप अधीक्षक सरिता भोसले यांनी केले आहे.