अलिबाग : वाहनांची वाढलेली वर्दळ, धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था, अनियंत्रित वेग यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. रायगड जिल्हा पोलिस हद्दीत दिवसाला जवळपास २ ते ३ अपघात होत आहेत. १ जानेवारी ते ३० जून २०२५ या ६ महिन्यात जिह्यात ३३५ अपघात झाले असून, यामध्ये १३६ जणांचा मृत्यू तर ४१३ जण जखमी झाले आहेत. यात सर्वाधिक म्हणजे ५५ बळी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गेले आहेत.
रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग हे तीन प्रमुख महामार्ग जात आहेत. याव्यतिरिक्त जिल्हाभरात विविध महामार्ग, राज्यमार्ग व जिल्हा मार्गांचे जाळे आहे. या मार्गांवर सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक सुरु असल्याचे दिसून येत असून, अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. चालकांनी वाहन सावकाश चालवावे यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर वाहतूक पोलिस वाहनचालकांची तपासणी करतात. वाहनचालकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई हाती घेतली आहे. एवढे प्रयत्न केल्यानंतर अपघातांची संख्या कमी करण्यात यश मिळाले आले तरी जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. मागील सहा महिन्यात जिल्ह्यात ३३५ अपघात झाले असून, यामध्ये १३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघातांची कारणमीमांसा
1) महामार्गांची संपूर्ण माहिती नसताना वेगाने वाहन चालवणे.
2) रस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहने.
3) रस्त्यावरील खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करणे.
4) कोणतीही पूर्वकल्पना न देता वाहन दुसर्या बाजूला नेणे.
5) दारू पिऊन वाहन चालवणे
6) धोकादायक वळणे.
जिल्ह्यातील अपघातांवर दृष्टीक्षेप
मार्ग | अपघात | मृत्यू | जखमी |
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग | ५० | ५५ | ६४ |
मुंबई-पुणे जुना महामार्ग | १९ | ६ | १६ |
मुंबई-गोवा महामार्ग | ८८ | ३२ | ८७ |
वडखळ-अलिबाग | ७ | २ | ५ |
माणगाव-दिघी | २५ | ९ | ३९ |
खोपोली-वाकण | २३ | ७ | ३९ |
पेण-खोपोली | १३ | ८ | ६ |
अंतर्गत राज्य मार्ग | ६० | ९ | ११४ |
इतर मार्ग | ५० | ८ | ४३ |
सध्या रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे.याचे मुख्य कारण म्हणजे अतिवेगाने वाहन चालवणे. यामुळे आपण आपल्या सोबत इतरांचाही जीव धोक्यात घालत आहोत.याची जाणीवच वाहनचालकांना नसते. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास काय कारवाई किंवा दंड होवू शकतो याबाबत जनजागृती केली जात आहे. ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात ठेवले आहेत. अभिजीत भुजबळ, पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा