अलिबाग: रायगड जिल्ह्यात महिला बचत गटांना गणराया पावला आहे. गणेशमूर्ती व्यवसायातून बचत गटांनी यंदा तब्बल १३ कोटी १३ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. त्यामुळे बचत गटातील महिलांना आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे.उमेद अभियाना अंतर्गत महिला बचत गटांना गणेशमूर्ती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्यात आले होते. याचे सकारात्मक परिणाम आता समोर आले हेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विवीध भागात महिलांकडून १ लाख ६६ हजार ८३३ गणेशमूर्ती तयार करून घेण्यात आला होत्या. ज्यांची गणेशोत्सवा दरम्यान विक्री करण्यात आली. यातून तब्बल १३ कोटी १३ लक्ष रुपयांची उलाढाल झाली.

रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणपती मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पेणमध्ये तयार केलेल्या गणपती मूर्तींना देश, विदेशात मोठी मागणी आहे. सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीवकाम, रेखीव डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे पेणच्या गणपती मूर्तींना स्वतची खास ओळख प्राप्त झाली असून, गणपती मूर्तींना गणेशमूर्तीना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. त्यामुळे या व्यवसायातील रोजगार संधी ओळखून पेण आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यातील महिला महिला बचतगटांना सक्रीय करण्यात आले. व्यवसायासाठी उमेद अभियानमार्फत महिला बचत गटांना फिरता निधी तसेच ग्राम संघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांमार्फत पतपुरवठा करण्यात आला, त्यामुळे महिलांच्या या व्यवसायाला गती प्राप्त झाली आहे. या व्यवसायामुळे महिलांच्या हाताला काम मिळाल्यामुळे त्या अधिक सक्षम बनल्या आहेत.

तालुका – गणेशमूर्तींची विक्री – उलाढाल

अलिबाग – १,२७७ – ८ लाख १५ हजार

कर्जत – ३,४५० – ३० लाख ५० हजार

खालापूर – १५० – २ लाख ३० हजार

महाड – ३२० – २ लाख ५० हजार

मागणाव – ४२० – ३ लाख ४५ हजार

म्हसळा – ३५८ – २ लाख ९६ हजार

मुरुड – ६५० – १६ लाख २५ हजार

पनवेल – २२० – ६ लाख ४५ हजार.

पेण – १ लाख ६८ हजार – १२ कोटी २१ लाख

पोलादपूर – १३५ – १ लाख ६५ हजार

रोहा – ९८ – ६० हजार

श्रीवर्धन – ४५० – ६ लाख ६५ हजार

सुधागड – १०० – ७० हजार

तळा – १३८ – २ लाख ६० हजार

उरण – ९६५ – ७ लाख १५ हजार

गणेशमूर्ती व्यवसायामधील संधी ओळखून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचे त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य देण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. – नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजिप.