सातारा : महाबळेश्वर, पाचगणीसह साताऱ्यात मे महिन्यापासून पाऊस सुरू असून, नोव्हेंबर उजाडला, तरी गिरिस्थानांवर जुलै-ऑगस्टसारखे धुके आणि पाऊस आहे. याचा थेट फटका पर्यटनाला बसला असून, स्ट्रॉबेरी उत्पादकही लागवडीसाठी उघडीप मिळत नसल्याने चिंतेत आहेत. यंदा ऑक्टोबर अखेरपर्यंत सुमारे साडेपाच लाख पर्यटक महाबळेश्वरमध्ये आले. कोविडपूर्व २०१८-१९ ची एकूण पर्यटक आकडेवारी १९ लाख आहे. अजून आर्थिक वर्ष संपायला पाच महिने असले, तरी २०१८-१९ चा आकडा गाठला जाईल का, याबाबत साशंकता आहे. कोविड काळानंतर २०२२-२३ मध्ये चार लाख, २०२३-२४ मध्ये नऊ लाख असा गेल्या दोन वर्षांतील पर्यटकांचा राबता दिसतो आहे, जो वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीपेक्षा कमी आहे.
पर्यटकांची संख्या कमी झाल्यामुळे पालिका प्रशासन, छोटे-मोठे व्यावसायिक, हॉटेलचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यंदा मे महिन्याच्या मध्यावरच पाऊस सुरू झाल्याने पर्यटकांची भटकंती बंद झाली. शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्या की, एप्रिल-मे महिन्यात महाबळेश्वर, पाचगणी, कास पठारावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप असते. येथील हिरवागार निसर्गरम्य परिसर, थंड हवामान, ऐतिहासिक किल्ले, प्राचीन स्थापत्यशास्त्रातील मंदिरे आणि सुंदर तलाव पर्यटकांना आकर्षित करतात. पुस्तकांचे गाव भिलार, मॅप्रो गार्डन, ‘मालाज्’चे खाद्यपदार्थ आणि वाईचे प्रसिद्ध कंदी पेढे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे देशभरातून अनेक पर्यटक येथे येतात. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होते.
पुढे पावसाळी पर्यटन आणि दिवाळी सुटीतही मोठी आर्थिक उलाढाल होते. मात्र, यंदा महामार्गापासून सुरूर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे आधीच हैराण झालेल्या हॉटेल, पर्यटन, वाहन व्यावसायिकांना आता अवकाळी पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.सुट्यांमध्ये होणाऱ्या मोठ्या आर्थिक उलाढालीवरच इतर महिन्यांचे खर्च भागत असतात; पण या वर्षी मात्र अवकाळी पावसामुळे ही सारी गणिते बिघडली आहेत. कर्ज काढून भाडेतत्त्वावर हॉटेल चालवणाऱ्या व्यावसायिकांची अवस्था बिकट झाली आहे. वेण्णा लेकच्या बोटिंगमधून आणि पर्यटकांच्या येण्यामुळे वन विभाग आणि पालिकेला मोठे आर्थिक उत्पन्न मिळते, तेही बुडाले आहे.
मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरमधील रस्ते खराब झाले आहेत. मुंबई, पुणे आणि राज्यभरातून, तसेच परराज्यांतून येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. पावसाने पर्यटकांनी आपली आरक्षणे (बुकिंग) रद्द केली आहेत. त्याचा व्यवसायांना मोठा फटका बसत आहे. यामुळे एकूणच अर्थकारण बिघडले आहे.डी. एम. बावळेकर माजी अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन
