Raj and Uddhav Thackeray Hindi Teaching in Primary Schools : इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (२६ जून) पत्रकार परिषद घेत ५ जुलै रोजी (आधी ६ जुलै ही तारीख जाहीर केली होती, जी काही वेळाने बदलण्यात आली) मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मोदान असा मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. तर, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषाप्रेमींच्या ७ जुलै रोजीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र, आता दोन्ही ठाकरे बंधू ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे. याबाबत आपलं दोन्ही नेत्यांशी बोलणं झाल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात सध्या हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली असून त्यास विरोध होत आहे. त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली आमच्या लहान मुलांवर हिंदी भाषा लादली जात आहे. हे हिंदी भाषेचं ओझं आमच्या मुलांना पेलवणार नाही, असं भाषातज्ज्ञांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातील अनेक राज्यांची तशीच भूमिका आहे. आमचा काही हिंदी भाषेला विरोध नाही. मात्र, शालेय शिक्षणात अशा प्रकारची जबरदस्ती आम्ही खपवून घेणार नाही. या त्रिभाषा सूत्रातून गुजरात राज्याला मात्र वगळलं आहे आणि महाराष्ट्रावर सक्ती केली जात आहे. याला मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्था-संघटनांनी विरोध करत ७ जुलै रोजी मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्यास उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता.
संजय राऊतांचा दोन्ही भावांशी संवाद
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी ७ जुलै रोजीच्या मोर्चाला पाठिंबा दिला. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी ६ जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. आम्हाला त्याविषयी कल्पना नव्हती. मात्र, या दोन्ही घोषणा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मला फोन केला. ते म्हणाले, ‘मला तुमच्या मोर्चाची कल्पना नव्हती. मात्र, अशा पद्धतीने मराठी भाषेसाठी दोन-दोन मोर्चे निघणं बर दिसतं नाही. एकत्र आंदोलन झालं तर त्याचा मोठा प्रभाव दिसू शकतो’. मी त्यावर आमच्या पक्षप्रमुखांशी चर्चा केली. उद्धव ठाकरे त्यावर आढेवेढे न घेता म्हणाले, ‘माझीही वेगळ्या मोर्चाची भूमिका नाही. मात्र ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्यामुळे आंदोलन लोकांपर्यंत पोहोचवणं कठीण होईल’. ही गोष्ट मी राज ठाकरे यांच्या कानावर घातली”.
“राजकीय अजेंड्याशिवाय मराठी माणसाचा मोर्चा”
राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झाल्यानंतर आम्ही राज ठाकरे यांना ५ जुलै ही तारीख सुचवली. त्यावर राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलून होकार दिला. त्यामुळे ५ जुलै रोजी मोर्चा काढला जाईल. कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय हा मोर्चा असेल. या मोर्चातून सरकारला मराठी माणसाची ताकद दिसेल”.