Raj Thackeray on Hindi Compulsory from 1st Standard : राज्यात पहिलीच्या वर्गापासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या सक्तीविरोधात राजकीय वर्तुळातून विरोध केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल आज मोठी घोषणा देखील केली आहे. ६ जुलै रौजी मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत. या मोर्चात सर्व राजकीय पक्षांना तसेच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सहभागी होण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. तर दुसरीकडे आजच उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेत हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज राज ठाकरेंची भेट घेत सरकारची भूमिका त्यांना सांगितली. मात्र ठाकरेंनी सरकारचे धोरण आपल्याला मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. या दरम्यान राज ठाकरे यांनी माध्यमांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच्या संभाव्य युतीबद्दल ज्या चर्चांवर देखील भाष्य केले आहे.
६ जुलै रोजी काढण्यात येणार्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आम्ही राज्यातील सर्व राजकीय पक्षांशी संपर्क साधणार असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील आजच पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आणि त्यांचाही या मुद्द्याला विरोध असल्याचे सांगितले. दरम्यान गिरगाव येथे काढण्यात येत असलेल्या मोर्चात उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्षाच्या सहभागाबद्दल विचारले असता राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हणल्यानंतर तेपण आलेच ना, त्यांच्याशीही बोलणार, आमची माणसं त्यांच्या लोकांशीही बोलणार… तुम्हाला आठवत असेल की, ज्याच्यावर इतके दिवस जे (एकत्र येण्याच्या चर्चा) चालु होतं ते माझं वाक्य लक्षात घ्या, ‘कुठलाही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे’, हे वाक्य तुम्हाला ६ (जुलै) तारखेला कळेल,” असे राज ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी देखील आज हिंदी भाषा लादण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदी भाषा आम्ही या सरकारला लहान मुलांवर लादू देणार नाही. हिंदी येत नसल्याने कुणाचंही काहीही अडलेलं नाही. भाजपाचं एकाधिकारशाहीचा छुपा अजेंडा मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. मी आज तमाम मराठी माणसांना आमच्या लढ्यात पक्षीय भेदाभेद विसरून सहभागी होण्याचं आवाहन करतो आहे. मराठी कलाकार, साहित्यिक, खेळाडू, वकील अशा सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं. भाजपाच्या अस्सल मराठी प्रेमींनीही आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे असंही माझं आवाहन आहे. हिंदी भाषेची सक्ती काहीही झालं तरीही लादू देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.