Raj Thackeray on Hindi Language Controversy: देवेंद्र फडणवीस सरकारने लागू केलेले त्रिभाषा सूत्र मागे घेतल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे व राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी घोषणा केलेला मोर्चाही रद्द करण्यात आल्याचं दोन्ही पक्षांनी जाहीर केलं. त्यामुळे शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावर तूर्तास पडदा पडला आहे. हे सगळं करण्याची गरजच नव्हती, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे. सोमवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी या संपूर्ण प्रकरणावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

हिंदी सक्तीबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

“काल महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले किंवा रद्द करणं त्यांना भाग पडलं. त्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचं मी अभिनंदन करेन. खरंतर काही गरज नसताना हा विषय आला होता. तो विषय आता रद्द झाला आहे. यासाठी मराठीजनांचे आभार मानेनच. पण त्याचबरोबर काही साहित्यिक, काही मोजके कलावंत, मराठी माध्यमांचे पत्रकार व संपादक यांचे आभार मानतो”, असं राज ठाकरे म्हणाले.

“हा मोर्चा निघाला असता तर…”

दरम्यान, रद्द झालेल्या मोर्चाबाबतही राज ठाकरेंनी भाष्य केलं. “हा विषय निघाला तेव्हा सर्वप्रथम आम्ही त्याला विरोध केला. वातावरण तापू लागलं. त्यावेळी महाराष्ट्रातील इतर सगळे राजकीय पक्ष त्यात आले. उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनीही त्याला पाठिंबा दिला. आम्ही मोर्चाची ५ तारीख जाहीर केली. हा मोर्चा निघाला असता तर न भूतो न भविष्यति असा मोर्चा निघाला असता. ७०-७५ वर्षांच्या लोकांना संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता. मराठी माणूस एकवटला की काय होतं हे कळलं. त्यामुळे सरकार परत अशा भानगडीत जाणार नाही अशी अपेक्षा मी बाळगतो”, असं ते म्हणाले.

“हे प्रकरण सरकारच्या अंगाशी आलं”

“माझ्याकडे दादा भुसे जेव्हा आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचं ऐकून तर घ्या. मी त्यांना सांगितलं होत की मी तुमचं ऐकून तर घेईन पण ऐकणार नाही आणि या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही. हे स्लो पॉयझनिंग आहे. हळूहळू या गोष्टी पेरल्या जातात. हा प्रकार त्यांनी करून पाहिला आणि ते त्यांच्या अंगाशी आलं. आता ते समिती वगैरे नेमतायत. त्यांनी ती नेमावी किंवा काही करावं. आमचं त्याच्याशी घेणंदेणं नाही. पण परत ही गोष्ट होणार नाही एवढं सरकारने नक्की लक्षात ठेवावं. असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही, या होणार नाही”, असं मत राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं.

“साधारणपणे पाचवी-सहावीनंतर हिंदी वगैरे विषय होते. मुळात हिंदी का आणण्याचा आग्रह केला हे कळलं नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही जी तुम्ही इतर राज्यांवर लादावी. ती एका प्रांताची आहे”, असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.

आता ५ तारखेचा मेळावा कसा होणार?

यावेळी राज ठाकरेंनी ५ तारखेच्या विजयी मेळाव्याबाबतही माहिती दिली. “काल हा निर्णय आल्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता. त्यांनी विचारलं पुढे काय करायचं. मी म्हटलं आत्ता मोर्चा तरी रद्द करावा लागेल. मग ते म्हणाले विजयी मेळावा घ्यायला पाहिजे. मी म्हटलं घेऊ. ५ तारखेला करु, पण ठिकाण वगैरे आत्ता जाहीर करू नका. त्याप्रमाणे मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलेन, मग माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील. मग ५ तारखेचा मेळावा होईल. त्या मेळाव्याला पक्षीय लेबलं लावण्यात अर्थ नाही. हा खरातर मराठी माणसाचा विजय आहे. त्या दृष्टीतूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे”, असं ते म्हणाले.

“खरंतर अनेक लोक बोलले होते की उत्तर भारतातले अनेक लोक महाराष्ट्रात नोकरीसाठी येतात. मग त्यांच्या भागात मराठी शिकवली पाहिजे. दीड-दोनशे वर्षांपूर्वीची एक भाषा तीन हजार वर्षांपूर्वीच्या भाषेवर लादण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. हे मान्य होणार नाही”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडली.