Raj Thackeray Shivsena UBT and Maratha Protest :  बीड दौऱ्यावर गेलेल्या राज ठाकरेंचा ताफा उद्धव ठाकरे गटाने आज थांबवला. यावेळी राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज ठाकरे यांचे स्वागत ज्या ठिकाणी केलं जाणार होतं त्या ठिकाणी जमावाने सुपाऱ्या फेकल्या, ‘सुपारीबाज, सुपारीबाज’ अशा घोषणा देखील दिल्या. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी जमलेले कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत केलं. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक्सवरून पोस्ट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“उ.बा ठा सुरवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही करू”, एवढ्या मोजक्या शब्दांतच संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या जमावातील काही लोक ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत होते. त्यामुळे हे मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते असावेत, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील कार्यकर्ते असावेत, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यांच्यापैकी अनेकांकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे झेंडे, मशाल चिन्ह असलेले झेंडे दिसत होते. त्यामुळे हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते असू शकतात.

हेही वाचा >> Raj Thackeray : बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवला, सुपाऱ्या फेकल्या; उबाठा गटाकडून घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

राज ठाकरे कोणाची सुपारी घेऊन आलेत? उबाठा गटाचा प्रश्न

दरम्यान, राज ठाकरेंना (Raj Thackeray) विरोध करण्यासाठी जमलेले शिवसेनेच्या ठाकरे गटातील काही कार्यकर्ते, बीड जिल्हा शिवसेना अध्यक्ष गणेश वरेकर एबीपी माझाशी बोलत असताना म्हणाले, राज ठाकरे यांनी लोकसभेला सुपारी घेऊन बिनशर्त पाठिंबा दिला (भाजपाला) होता. आता विधानसभेला ते कोणाची सुपारी घेऊन मराठवाड्यात आले आहेत? हे विचारण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत.

मराठा आंदोलक राज ठाकरेंचा विरोध का करतायत?

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाज एकवटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी समुदाय त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन करू लागला आहे. दोन समाज संघर्ष करत असताना राज्य सरकारने यावर भूमिका स्पष्ट केलेली नाही. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मराठा, ओबीसींसह सर्वच समाज राज ठाकरेंवर संतापले आहेत. “महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही. आपल्याला केवळ पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे”, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray shivsena ubt and maratha protest sandeeep deshpande reaction sgk