Raj Thackeray Slam CM Devendra Fadnavis : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषा आणि हिंदीच्या सक्तीचा मुद्दा चर्चेत आहे. यादरम्यान आज शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. यावेळी त्यांनी अर्बन नक्सलचा मुद्दा देखील उपस्थित केला.

“महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांसाठी हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय. पण महाराष्ट्रात जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार मुख्यमंत्र्यांच्या मनात नाही. महाराष्ट्रातील मराठी माणूस, महाराष्ट्रातील भूमिपूत्र याचा विचारच नाही. याचं सर्वात मोठं विदारक स्वरूप कुठे असेल तर ते रायगड जिल्ह्यात आहे,” असे राज ठाकरे म्हणाले.

“राज्य सरकारने कायदा आणला आहे. तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्सल आहात. शहरामध्ये राहणारे नक्सल… तुम्ही जर कोणत्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं. एकदा करूच देत. या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान-सन्मान राखूनच तुम्हाला आणावे लागतील. त्या शिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत,” असेही राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे उत्तर

दरम्यान राज ठाकरेंच्या या टीकेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देखील दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, “माझं अतिशय पक्कं मत आहे. महाराष्ट्रात मराठी शिकली पाहिजे. ती अनिवार्य असली पाहिजे ती आपण अनिवार्य केलीच आहे. पण महाराष्ट्रातील मराठी मुलांना मराठीसोबत आणखी एक भापतीय भाषा शिकायला मिळाली तर त्यात काय वावगं आहे. आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजीकरिता पायघड्या घालायच्या ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे,” असे फडणवीस म्हणाले.

राज ठाकरेंनी अर्बन नक्सलच्या मुद्द्यावर केलेल्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “तुम्ही अर्बन नक्सलसारखे वागाल तर तुमची अटक होईल. तुम्ही अर्बन नक्सलसारखे वागत नाहीत तर तुमची अटक करण्याचे कारण नाही. जे लोकं कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरिता तो कायदा आहे. आंदोलकांच्या विरोधात तो कायदा नाही, सरकारच्या विरुद्ध बोलण्याची यात पूर्ण मुभा आहे. त्याच्याविरोधात हा कायदा नाही. अशा प्रकारच्या कमेंट या कायदा न वाचता केलेल्या कमेंट्स आहेत.”