भाजपा सरकारने नुकतेच नऊ वर्षे पूर्ण केली. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यावरून आल्यानंतर नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा मोठा कार्यक्रम पार पाडला. त्यानंतर भाजपाच्या नऊ वर्षेनिमित्त त्यांनी भव्य कार्यक्रम आयोजित करून नऊ वर्षात केलेल्या विकासांचा पाढा वाचून दाखवला. मात्र, यावरून ठाकरे गटाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, काळा पैसा वाढला, रोजगार देण्याचे वचन फसले. या सगळय़ा गोष्टींमुळे जगात भारताची मान उंच झाली असे मोदींच्या अंध भक्तांना वाटणे स्वाभाविक आहे.कारण त्यांच्या दृष्टीने ‘मोदी हाच भारत व भारत म्हणजेच मोदी’, पण प्रत्यक्षात हा प्राचीन देश म्हणजे एका व्यक्तीच्या हाती असलेला ‘सन्गोल’ म्हणजे राजदंड नाही. मोदींनी 28 तारखेस नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. त्यात राजदंडाचे प्रतीक बसवले ते स्वतःची राजेशाही स्थापित करण्यासाठी. आता या नव्या राजेशाहीमुळे जगात देशाची मान कशी उंचावली? भारत म्हणजे लोकशाहीची जननी आहे. ही जननी राजदंडात नाही. राजदंडातील राजधर्माचे पालन सध्या होत नाही, भ्रष्टाचाराला पाठीशी घातले जात आहे. अशा वेळी राजदंड काय करणार? मोदी यांची नऊ वर्षे म्हणजे देशाच्या, जनतेच्या नाकी नऊ आलेला कालखंड आहे. तो लवकर संपेल तेवढे बरे!”, अशी टीका ठाकरे गटाने त्यांच्या मुखपत्र असलेल्या सामनातून केली आहे.

“श्री.नरेंद्र मोदी व त्यांचे सध्याचे सहकारी म्हणजे कमाल आहे. खोटारडेपणाच्या बाबतीत एकाला झाकावे व दुसऱ्याला काढावे असेच एकापेक्षा एक असे सरस लोक आहेत. मोदी सरकारला नऊ वर्षे झाली व त्यानिमित्त मोदींच्या माणसांनी खोटेपणाची बहार उडवून दिली आहे. देशभरात केंद्रीय मंत्र्यांच्या पत्रकार परिषदा सुरू आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मुंबईत आल्या व त्यांनी खोटेपणावर कळस चढवला. मोदींमुळे देशाला मान मिळाला, जगभरात भारताची मान उंच झाली वगैरे हास्यतुषार त्यांनी उडवले. मोदी 2014 साली पंतप्रधानपदी आले. त्याआधी जगात देशाला मान नव्हता असे निर्मलांना सांगायचे आहे काय?”, असा प्रश्नही यावेळी विचारण्यात आला.

अंध भक्तांनी मोदींविषयी अनेक कल्पित कथा पसरवल्या

“मोदी व त्यांच्या अंध भक्तांच्या दृष्टीने हिंदुस्थान २०१४ नंतरच निर्माण झाला. त्याआधी हा देश अस्तित्वात नव्हता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व देशाच्या उभारणीत कोणतेही योगदान नसलेला राजकीय पक्ष गेल्या नऊ वर्षांपासून सत्तेवर आहे व हीच नऊ वर्षे म्हणजे देश असे त्याचे सांगणे आहे. मोदींमुळे जगात मान वाढला. म्हणजे कसा? अंध भक्तांनी मोदींविषयी अनेक कल्पित कथा पसरवल्या. मोदी हे नुकतेच ऑस्ट्रेलियात जाऊन आले. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी असे सांगितले की, मोदी हेच ‘बॉस’ आहेत, पण त्याच ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानातील पाच राज्यांतील विद्यार्थ्यांना व्हिसा नाकारला आहे. सात राज्यांवर निर्बंधच घातले. मोदी ‘बॉस’ असल्याचे हे लक्षण कसे मानायचे? जपानमध्ये ‘क्वॉड’ परिषद झाली. तेथे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन होते. मोदी भक्तांनी असे पसरवले की, मोदी यांच्या जागतिक प्रभावामुळे बायडेन प्रभावित झाले. त्यांनी मोदींना विचारलं, ”तुम्ही इतकी वर्षे राष्ट्रीय राजकारणात कसे काय टिकलात? त्याचा मंत्र काय?” मुळात बायडेन यांचे वय ८० आहे व ते १९७१ पासून अमेरिकेच्या सिनेटवर आहेत. त्यामुळे बायडेन मोदींकडे यशाचा मंत्र विचारतील हे शक्य नाही, पण भक्तांनी तसे पसरवले. बायडेन हे मोदींचे इतके फॅन बनले की, त्यांनी मोदींचा ऑटोग्राफ घेतला. हे असे घडले याची एक ओळीची बातमी अमेरिकेच्या मीडियात नाही. अशा बातम्या पसरवल्यामुळे पंतप्रधानांचे हसे होते हे भक्तांनी समजून घेतले पाहिजे”, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

सरकारी दहशतवाद

देशाच्या राजधानीत दिल्लीत रोज मुली व महिलांवर अत्याचार व हत्या होत आहेत. महिला कुस्तीपटू त्यांच्यावरील अत्याचारांविरोधात दिल्लीच्या रस्त्यावर एक महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. काल जेव्हा दिल्लीतल्या संसद भवनाचे उद्घाटन मोदी करीत होते त्याच वेळी या महिला कुस्तीपटूंना केंद्राचे पोलीस फरफटत पोलीस व्हॅनमध्ये कोंबत होते. हासुद्धा एक प्रकारचा सरकारी दहशतवाद आहे. त्यामुळे भारतास दहशतवादापासून मुक्त केले म्हणजे नक्की काय केले? हा सवाल आहे. निर्मला सीतारामन यांचे म्हणणे आहे की, ”या सरकारच्या काळात 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले ही मोदींची कृपाच आहे!” खरं तर १४० कोटी लोकसंख्येपैकी ८० कोटी लोकांना आजही सरकारच्या रेशनवर गुजराणा करावा लागतो, ते स्वावलंबी किंवा आत्मनिर्भर बनू शकत नाहीत हा मोदींचा पराभव आहे. ८० कोटी लोक सरकारी भिकेवर जगतात यास सीतारामन विकासाचे मॉडेल मानतात काय? पेट्रोल, डिझेल महागले, स्वयंपाकाचा गॅस, कडधान्य, शिक्षण, वाहतूक सर्वच महागले, पण महागाईला मोदींचे सरकार जबाबदार नसून सूर्य, चंद्र म्हणजे निसर्ग जबाबदार असल्याची मुक्ताफळे सीतारामन यांनी उधळली होती. नोटाबंदीसारखे प्रयोग फसले आहेत. नऊ वर्षांत दोन वेळा नोटाबंदी करून मोदी सरकारने काय साधले? अर्थव्यवस्था ढिसाळ केली. दोन हजारांची नोट आणतात काय आणि लगेच रद्द करतात काय? सगळाच खेळखंडोबा सुरू आहे, अशी टीकाही या माध्यमातून करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajdharma in the scepter is not followed because of the new monarchy the thackeray groups attack on modi sgk