राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, खड्डेयुक्त रस्ते, पाण्याचा अभाव, बेरोजगारी, भूकबळी हे सर्व प्रश्न काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने निर्माण केले असून या समस्या सोडवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला गाडा व भाजपचे सक्षम सरकार सत्तेवर आणा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
निलंगा येथील मार्केट यार्डच्या प्रांगणात भर उन्हात हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सभेला गडकरी संबोधित होते. व्यासपीठावर संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, पाशा पटेल, आ. सुधाकर भालेराव, शैलेश लाहोटी, अशोक बाहेती, अजित माने आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात जातीपातीत भांडणे लावण्याचे काम काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने केले. मराठा आरक्षणाचा मुद्दा एकाने उचलून धरला तर त्यांच्याच सरकारमधील भुजबळांनी ओबीसीचे कारण काढत आरक्षणाला विरोध केला. धनगर समाजाच्या प्रश्नासाठी आदिवासी मंत्री पिचड अडून बसले. दोन वर्षांपूर्वीच राज्य भारनियमनमुक्त करूची घोषणा सरकारने केली, मात्र भारनियमन वाढतच राहिले. आबा, बाबा व दादाच्या सरकारने राज्यातील सामान्य माणसांची वाट लावली. या मंडळींना या निवडणुकीतून कायमचे हद्दपार करा, असे आवाहनही गडकरी यांनी केले.
महाराष्ट्राचे कृषिमंत्री शरद पवार सत्तेवर होते. मध्य प्रदेश सरकारने शेतीचा विकास २४ टक्क्यांवर नेला म्हणून भाजपाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा दिमाखात सत्कार केला. मात्र महाराष्ट्राचा कृषी विकासदर २ टक्क्यांच्या वर जातच नाही याबद्दल या सरकारला काहीही वाटत नाही. महाराष्ट्र धनवान आहे, श्रीमंत आहे, मात्र येथील जनता गरीब आहे. सामान्य माणसाचा विकास व्हावा असे सरकारातील मंडळींना वाटत नाही. आपली घरे भरण्यातच त्यांनी धन्यता मानली असल्याचे गडकरी म्हणाले.
सध्या देश संकटातून जातो आहे. काश्मीरला मोठा पूर आला. मोदी सरकार सत्तेवर आल्यामुळे मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवून देतील, अशी भीती दाखवली गेली. मात्र काश्मीरमधील पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे काम सरकारने केले. काश्मीरला उभे करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करते आहे. सामान्य माणसाला मदत करावी या हेतूने पंतप्रधान जन-धन योजना सुरू केली आहे. ज्या योजनेत १ लाख रुपयांचा विमा, ३० हजार रुपयांपर्यंत कुटुंबाला आरोग्यासाठी मदत व ५ हजार रुपयांचे डेबीट कार्ड दिले जाणार आहे. गेल्या ६० वर्षांंत काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला मात्र सामान्यांची गरिबी हटली नाही. वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, डी.एड्., बी.एड्., आश्रमशाळा यातून काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने ‘अध्रे तुम्ही, अध्रे आम्ही हीच आमची रोजगार हमी’ अशी योजना सुरू केली. युती शासनाच्या काळात आपण मुंबई-पुणे रस्ता केला. त्यानंतर सरकारचे ४२० कोटींचे काम आघाडी सरकारने १८०० कोटीला दिले. राज्यभर चारसो बिसीचाच कारभार राहिला. केंद्रात सत्ता आल्यानंतर आपल्या खात्याने १०० दिवसांत ४० हजार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला आहे. नागपूर ते रत्नागिरी माग्रे तुळजापूर या रस्त्यावर कोटय़वधी रुपये खर्च होणार आहेत. पाण्यावर चालणारे विमान आपण आणणार असून यातून लोकांचे पसे वाचणार आहेत. इथेनॉलवर चालणाऱ्या वातानुकूलित बसेस नागपुरात सुरू झाल्या आहेत. शेतमालाला किंमत मिळत नाही, ती अधिकच मिळण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. विकासाची दृष्टी असणारे सरकार केंद्रात आहे. आज नरेंद्र मोदींना जगभर मान्यता आहे. त्यांचीच दृष्टी घेऊन राज्यात भाजपचे सरकार चालवले जाणार असून येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Oct 2014 रोजी प्रकाशित
काँग्रेस, राष्ट्रवादीला गाडा अन् महाराष्ट्र समस्यामुक्त करा : गडकरी
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, खड्डेयुक्त रस्ते, पाण्याचा अभाव, बेरोजगारी, भूकबळी हे सर्व प्रश्न काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने निर्माण केले असून या समस्या सोडवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला गाडा व भाजपचे सक्षम सरकार सत्तेवर आणा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

First published on: 06-10-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally of nitin gadkari in latur