Ramdas Kadam wife Jyoti Kadam Explain Accident : शिवसेनेच्या (शिंदे) दसरा मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळी विधाने केली आहे. यानंतर दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब यानी रामदास कदम यांच्या पत्नीने १९९३ साली स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला होता. यावर आता रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम माध्यमासमोर आल्या आहेत. त्यांनी तेव्हा नेमकं काय झालं होतं याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
रामदास कदमांच्या पत्नी ज्योती कदम म्हणाल्या की, काल त्यांनी जे आरोप आमच्या कुटुंबावर केले आहेत ते फार चुकीचे आहेत. १९९३ साली माझा जो अपघात झाला, तो स्टोवर झालेला आहे. तेव्हा असं नव्हतं की आमच्याकडे गॅस लाईन आहे किंवा सिलेंडर आहे, आम्ही एवढे श्रीमंत नव्हतोच. आम्ही करवंट्या जाळूनही जेवण केलं आहे. माध्यमांमध्ये येतंय की स्टोने कसं? आमदाराच्या घरी स्टो कसा असू शकतो? तर स्टो होता आणि गॅसपण होता. स्टोवर पण बायका स्वयंपाक करत होत्या आणि मी ते करत होते.
नेमकं काय झालं?
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, मी उभी असताना माझा पदर त्या स्टोवरती पडला आणि भडका उडाल्यानंतर स्फोट झाला, त्यामध्ये मी भाजले. त्यानंतर गाडी करून आम्ही खेडावरून कांदीवलीच्या हॉस्पीटलमध्ये आलो, तेथे आम्हाला सांगितले की थेट जसलोकला घेऊन जा. तिथे मी दोन महिने भरती होते आणि बाजूच्या रूमध्ये साहेब (रामदास कदम) होते.
त्यांनी असं करणे शक्यच नाही. ते असं का करतील? असं केलं असतं तर वाचवण्याचा प्रयत्न देखील करणार नाहीत. स्वतः त्यांनी वाचवताना त्यांचा हात देखील भाजला आहे… असं राजकारण फार चुकीचं आहे. मी यापूर्वी कधीही माध्यमांसमोर आले. मला राजकारण कधी महिती नव्हतं. असं करणं फार चुकीचं वाटतंय म्हणून मी आज सांगितलं की मी माध्यमांसमोर बोलते. आता यावर प्रतिक्रिया येतील की बायकोला आणलं…. पण याचा कुटुंबाला देखील त्रास होतो आहे, असे ज्योती कदम म्हणाल्या.
“असं काही झालेलं नाहीये. त्याच्यानंतर (त्या अपघातानंतर) आता आमच्या लग्नाला ४७ वर्ष झाली आहेत. हे खोटं आहे सगळं. राजकारणासाठी तुम्ही कुटुंबाचा उपयोग होऊ नये,” असेही पुढे त्यांनी सांगितले.
अनिल परब काय म्हणाले होते?
अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर आरोप करताना त्यांचा मुलगा आणि राज्याचे विद्यमान गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना काही प्रश्न विचारले होते. “१९९३ साली तुझ्या आईने आत्महत्या करण्याचा किंवा जाळून घेण्याचा प्रयत्न का केला होता? याची चौकशी कर. माझे आव्हान आहे की, नार्को टेस्ट झालीच पाहिजे. यामध्ये बाळासाहेबांचे ठसे कुणी घेतले? का घेतले? याची चौकशी झाली पाहिजे. पण त्याचबरोबर १९९३ साली रामदास कदम यांच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याचाही तपास केला पाहिजे”, असे विधान अनिल परब यांनी केले.