शरद पवारांपासून तर ममता बॅनर्जींपर्यंत सगळेच नेते आमच्या पंगतीत जेवून गेले, त्यावेळी वाढायला मीच होतो, असं विधान भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. तसेच ४०० पारच्या घोषणेमुळे भाजपाचे नुकसान झालं, या दाव्यावरही त्यांनी भाष्य केलं. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

रावसाहेब दानेव यांनी नुकताच एबीपी माझा या वृत्तावाहिनीला मुलखात दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांबाबत केलेल्या विधानावरही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, एखादा पक्ष किंवा एखाद्या गटाला भाजपा मदत करू इच्छित असेल, तर यात गैर काहीही नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच आज जे लोक आमच्यावर टीका करत आहेत, कधीकाळी ते आमच्या बरोबर होते. ते आमच्याच पंगतीत जेवून गेले आणि त्यांना वाढायलाही मीच होतो, असं मिश्किल विधानही त्यांनी केलं.

हेही वाचा – “मोदी-शाहांनी अहंकाराच्या सर्व मर्यादा तोडल्या, तुम्ही काय करणार?” संजय राऊतांचा आरएसएसला थेट सवाल

नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे?

“अजित पवार यांना भाजपाबरोबर यायचं होतं. एखादा पक्ष किंवा एखाद्या गटाला भाजपा मदत करू इच्छित असेल, तर यात गैर काहीही नाही. राष्ट्रवादीने यापूर्वीही भाजपाबरोबर युती केली होती. १९८५ मध्ये स्वत: शरद पवार माझ्या प्रचाराला आले होते. खरं तर ज्या लोकांनी आमच्यावर आरोप केले ते सर्व पक्ष कधीकाळी भाजपाबरोबर होते” असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.

“…तेव्हा वाढायला मीच होतो”

“फारुख अब्दुल्ला आमच्यावर जातीवादाचे आरोप करतात, मात्र, त्यांचे पूत्र ओमर अब्दुल्ला हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. मायावती आमच्यावर आरोप करतात, पण त्या आमच्या पाठिंब्यामुळे दोन वेळा मुख्यमंत्री होत्या. ममता बॅनर्जी आमच्यावर आरोप करतात, पण त्या आमच्या सरकारमध्ये रेल्वेमंत्री होत्या. शरद पवार आमच्यावर आरोप करतात, पण ते १९८५ ला आमच्या बरोबर होतो. त्यांनी स्वत: माझा प्रचार केला. त्यामुळे आज जे विरोधात आहेत, त्यापैकी जवळपास सगळे नेते आमच्या पंगतीत जेऊन गेले. त्यावेळी वाढायला मीच होतो”, असं मिश्किल विधानही त्यांनी केलं.

हेही वाचा – ‘ऑर्गनायझर’मधील ‘त्या’ लेखावर RSS सदस्य रतन शारदांनी मांडली भूमिका; अजित पवारांचा उल्लेख करत म्हणाले…

“४०० पारचा नारा चुकीचं नव्हता”

दरम्यान, ४०० पारच्या घोषणेमुळे भाजपाला नुकसान झालं, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रत्येक निवडणुकीत एक नारा दिला जातो. कधी त्याचा फायदा होतो तर कधी त्याचे नुकसानही होते. अबकी बार चारसो पार हा नारा देणं काही चुकीचं नव्हतं. पण विरोधकांनी त्यावरून गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न केला, तोच चुकीचा होता. ४०० जागा मिळाल्या तर मोदी संविधान बदलतील असा गैरसमज पसरण्यात आला. मात्र, हे कधीही शक्य नाही. संविधानाचा ढाचा बदलता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानेही म्हटलं आहे. उलट ज्यावेळी पंतप्रधान मोदी संसदेत पोहोचले, तेव्हा त्यांनी संविधानावर डोकं टेकवलं”, असं ते म्हणाले.