रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात “मिशन फिनिक्स” अंतर्गत दापोली व मंडणगड तालुक्यात पोलीसांनी मोठी कारवाई करत सुमारे २ कोटी २२ लाख रुपये किमतीचा चरस जप्त केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. एक आरोपी अद्याप फरार असल्याने त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
दापोली पोलीस ठाण्याला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. केळशी किनारा मोहल्ल्यात अनार इस्माईल डायली ( वय ३२) यांच्या घरावर छापा टाकून त्याच्या घरामागील पडवीतून गडद लाल आणि हिरव्या पॅकिंगमध्ये ठेवलेला ०.९९८ किलो वजनाचा चरस जप्त केला. याची किंमत सुमारे २४ लाख रुपये होती. चौकशीत अनारने अकिल अब्बास होडेकर (वय ४९) कडून हा चरस विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले.
पोलिसांनी अकिल होडेकर याला ताब्यात घेत त्याच्याकडून मंडणगड तालुक्यातील साखरी गावातील समुद्रकिनाऱ्यावर लपवलेले उर्वरित ४ पिशव्यामधील चरस जप्त करण्यात आला. एकूण ४.७३१ किलो चरस जप्त करण्यात आला, ज्याची किंमत सुमारे २ कोटी १८ लाख ९२ हजार रुपये एवढी आहे. तपासादरम्यान तावीस महमूद डायली (वय ३०) यालाही या प्रकरणात ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, ठाणे शहर येथील शिळ डायघर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या (गु.र.नं. ८६७/२०२५) एन.डी.पी.एस. गुन्ह्यातील आरोपी ममुद बदुद्दीन ऐनटकर (वय-२९, रा. खोंडा, दापोली) याचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. रत्नागिरी पोलीस लवकरच त्याचा ठाणे न्यायालयाकडून ताबा घेणार असून, त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात येणार आहे. या कारवाईत आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. ही कारवाई दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश तोरसकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. याबाबत अधिक तपास सुरु ठेवण्यात आला आहे..