रत्नागिरी– रत्नागिरी नगर परिषदेने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, शहरातील मतदार यादी निश्चित करण्याचा कार्यक्रम पूर्ण करत ३१ ऑक्टोबर रोजी पालिकेने ६४ हजार ७४० मतदाराची अंतिम यादी जाहीर केली. यामध्ये सुमारे १ हजार ९०० दुबार मतदार असल्याने या मतदार यादीवर दुबार म्हणून शेरा मारण्यात आला आहे. यासर्वांच नोटीसा काढण्यात येवून त्यांच्या कडून हमी पत्र घेण्यात येणार आहे.

रत्नागिरी शहर परिसरातील १ हजार ९०० दुबार मतदारांची नावे नोटीस बोर्डवर जाहीर करण्यात येणार आहेत. त्यांच्याकडून कुठे मतदान करणार, हे देखील लिहून घेतले जाणार असून त्याला प्रतिसाद न मिळाल्यास मतदान करताना त्यांच्याकडून हमीपत्र घेतले जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर निवडणुकीच्या कामांना प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. आगामी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहराची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात होती. यामध्ये सुमारे ७४ हजारांच्यावर मतदार आहेत. त्यापैकी ७ हजार ५०० मतदारांवर हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र या बाबत पालिकेने स्थळ पाहणी करून हरकती निकाली काढल्या. तशी मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्यास सांगितले गेले.

साडेतीनशे मतदारांवर आक्षेप असल्याने त्यांना पालिकेने बाजू मांडण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. त्याची प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्याकडे सुनावणी होऊन हरकती निकाली काढण्यात आल्या. त्यानुसार मतदार यादीमध्ये बदल करून ३१ ऑक्टोबरला ६४ हजार ७४० मतदाराची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. पालिकेने हरकतींचा अभ्यास करून अनेक ठिकाणी स्थळपाहणी केली. त्यानुसार यादीमध्ये सुधारणा सुचवण्यात आल्या. आतापर्यत ६ हजार ६९९ मतदारांच्या तक्रारी आहेत. त्याबाबत पालिकेने दिलेला मतदानाचा पर्याय ३ हजार २२५ मतदारांनी मान्य करुन इतर ३ हजार ४७४ मतदारांना तो अमान्य केला आहे. याबाबत पालिकेकडून लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे.