रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थी वेब सिगारेटच्या आहारी गेल्याचा प्रकार रत्नागिरी शहरात उघडकीस आला आहे. या सिगारेटच्या विक्रिवर बंदी असताना देखील शहरात राजरोसपणे हे सिगारेट विक्री करणा-या दुकानावर शहर पोलिसांनी धाड टाकून १ लाख ७२ हजार ५०० रुपये किंमतीच्या वेब सिगारेट ताब्यात घेतले आहे.

रत्नागिरी शहर पोलिसांनी टाकलेल्या धाडी नंतर तपास कार्याला सुरुवात केली असून हे सिगारेट रत्नागिरी शहरातील काही शाळांमधील मुलांच्या दप्तरामध्ये आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रत्नागिरी शहरातील तेली आळी नाक्यावर असलेले जय गगनगिरी जनरल स्टोअरवर टाकलेल्या धाडीत ई- सिगारेट विक्री करत असताना दुकानाचा मालक गोविंद दिनेश गजरा (वय-४१) रा. तेली आळी नाका, रत्नागिरी याला सोमवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट प्रतिबंध उत्पादन, निर्मीती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठा आणि जाहिरात कायदा २०१९ कलम ७ व ८ प्रमाणे ही कारवाई केली आहे. काही दिवसा पासून रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी दशेत असलेल्या शाळकरी मुलांमध्ये कायदयाने बंदी असलेल्या ई- सिगारेट (वेब) सेवनाचे तसेच शाळेतील दप्तरांमध्ये बाळगण्याचे प्रमाण वाढल्या बाबतच्या तक्रारी पोलीस ठाण्यात शाळेतील शिक्षकांमार्फत आलेल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने रत्नागिरी शहरामध्ये ई- सिगारेट (वेब) विक्रीबाबत विशेष पथक तयार करुन शोध मोहीम सुरु करण्यात आली होती.

मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे रत्नागिरी शहरातील तेली आळी नाका येथील जय गगनगिरी जनरल स्टोअर मध्ये ई- सिगारेट (वेब) विक्री करीत असल्याचे टाकलेल्या छाप्यात उघड झाले. याप्रकरणी दुकानाचा मालक गोविंद दीनेश गजरा याला ताब्यात घेवून १लाख ७२ हजार ५०० रुपये किंमतीचे ई- सिगारेट पंचनामा करुन जप्त करण्यात आले आहे.