दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे रक्तचंदन सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रक्तचंदनाची तस्करी दाखवण्यात आली असून कशा पद्दतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची विक्री केली जाते याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. दरम्यान सांगलीत पोलिसांनी तब्बल अडीच कोटींचं रक्तचंदन जप्त केलं आहे. मिरज येथे ही कारवाई करण्यात आली आहे. हे रक्तचंदन विदेशात तस्करी केलं जाणार होतं अशी शंका आहे. महाराष्ट्रातील गेल्या पाच वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तब्बल एक टन रक्तचंदन कर्नाटकमधून कोल्हापूरला नेले जात होते. पोलिसांना या तस्करीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जकात नाक्यावर वाहनं तपासण्यास सुरुवात केली. यावेळी महात्मा गांधी पोलिसांना एका टॅम्पोत हे रक्तचंदन सापडलं. पोलिसांनी याप्रकरणी यासीन इनायत उल्ला खान यास अटक केली आहे. एक गाडी आणि रक्तचंदनसहित अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, या कारवाईमुळे आंतरराज्य टोळी उघडकीस आली आहे.

“अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर जकात नाक्यावर पोलीस आणि वनविभागाने संयुक्त कारवाई करत सापळा रचला होता. यावेळी कर्नाटकमधून आलेलं एक वाहन सापडलं असून त्यातून एक टन चंदन मिळालं आहे. याची किंमत २ कोटी ४५ लाख ८५ हजार आणि १० लाखांचा टेम्पो असा एकूण २ कोटी ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक केली असून तपास सुरु आहे,” अशी माहिती पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Red sandalwood rakt chandan worth crores seized in sangli sgy