आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भूमिका

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : राज्यात करोना निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करावी, अन्यथा ते रद्द करावेत, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. आपल्याला जनहिताचा निर्णय घ्यावा लागेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत अभ्यास करून योग्य निर्णय घेतील, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

राज्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई पट्टय़ात आणि विदर्भात रुग्णसंख्या कमी होत आहे, तर कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अधिक आहे. राज्यभर निर्बंध लागू असले तरी त्यांचे काटेकोर पालन होत नाही. सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने मुंबई-ठाणे जिल्ह्य़ातील नोकरदारांचे हाल होत आहेत.

या पार्श्वभूमीवर टोपे म्हणाले, निर्बंधांची कडक अंमलबजावणी झाली, तर रुग्णसंख्या आटोक्यात येईल, अन्यथा ते काढून टाकावेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांबरोबर दृक्श्राव्य माध्यमाद्वारे घेतलेल्या बैठकीत मी हे मत व्यक्त केले आहे.

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी राज्यातील रुग्णसंख्येविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे परिस्थितीचा अभ्यास करून निर्बंधांबाबत निर्णय व्हावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.

राज्याला दरमहा तीन कोटी लशींचा पुरवठा व्हावा, अशी विनंती केंद्र सरकारला करण्याचा ठराव राज्य विधिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना मी विनंती करणार आहे.

मुंबई, ठाणे, विदर्भ व अन्यत्र ठिकाणी लशींच्या पुरवठय़ाअभावी लसीकरण बंद होते. या भागात सोमवारी दुपापर्यंत पुरवठा होईल, असे टोपे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restrictions not strictly enforced in maharashtra says rajesh tope zws