Rohit Arya Powai Hostage Incident: गेल्या आठवड्यात मुंबईतील पवई येथे रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने राज्य सरकारकडून, केलेल्या कामांची बिले न मिळाल्याचा आरोप करत १७ मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवले होते. यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत रोहित आर्यचा मृत्यू झाला होता, तर पीडित मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली होती.
तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या या ओलीस नाट्यादरम्यान आरोपी रोहित आर्यने पोलिसांना माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले होते, असे एका आयपीएस अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, जेव्हा पोलिसांनी दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा केसरकरांनी आर्यशी बोलण्यास नकार दिला आणि त्याऐवजी त्यांना शालेय शिक्षण विभागातील सध्याच्या अधिकाऱ्यांशी आर्य यांचा संपर्क साधून द्यावा असे सांगितले.
शालेय शिक्षण विभागासाठी राबविण्यात आलेल्या प्रकल्पाचे पैसे न मिळाल्याने तो नाराज असल्याचे आर्य याने पोलिसांना सांगितले होते. “ज्या व्यक्तीला तो प्रश्न विचारू इच्छित होता ते व्यक्ती केसरकर होते आणि त्यानुसार, एका डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याने केसरकर यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली. पण माजी मंत्री दीपक केसरकर आर्यशी बोलू इच्छित नव्हते”, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
याबाबत द इंडियन एक्सप्रेसने दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “मी पोलीस पथकाला सांगितले की त्यांनी रोहित आर्यचा विभागातील संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून द्यावा. जेव्हा मला कळले की हा मुद्दा थकबाकीशी संबंधित आहे, तेव्हा मी पोलिसांना सांगितले की ज्या विभागाकडे त्यांची थकबाकी प्रलंबित आहे त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी रोहित आर्यचे बोलणे करू द्या. मला कल्पना नव्हती की हे प्रकरण इतके गंभीर होईल.”
पोलीस मुलांची सुटका करण्यासाठी रोहित आर्यशी वाटाघाटी करत होते. त्यादरम्यान पोलिसांची क्विक रिक्यू टीम स्टुडिओच्या वॉशरूममधून आता घुसली. त्यावेळी रोहित आर्यने पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. प्रत्युतरार्थ पोलीस पथकाच्या प्रमुखाने केलेल्या गोळीबारात रोहित आर्यचा मृत्यू झाला. यानंतर पोलीस पथकाने १७ मुलांसह १९ जणांची सुटका केली.
