राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर याआधी रुग्णवाहिका खरेदी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. आता पुणे महानगरपालिकेच्या निलंबित अधिकाऱ्याने लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. निलंबित अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी आरोग्य मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच मी मागासवर्गीय असल्यामुळेच माझ्यावर जाणूनबुजून निलंबनाची कारवाई केली असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. याच आरोपाला धरून आता रोहित पवार यांनीही सरकारला लक्ष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“…म्हणून देवेंद्र फडणवीस नाईलाजाने प्रचारात उतरले”, गडकरींचा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा; मोदी-शाहांना केलं लक्ष्य!

अधिकाऱ्यांना नांग्या मारणारा भ्रष्टाचाराचा खेकडा कोण?

रोहित पवार यांनी आज एक्स अकाऊंटवर एक पोस्ट टाकत डॉ. भगवान पवार यांचे पत्र शेअर केले आहे. तसेच अधिकाऱ्यांना नांग्या मारणारा भ्रष्टाचाराचा खेकडा कोण? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. “आरोग्य विभागात रुग्णवाहिका खरेदीमध्ये साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या ‘खेकड्या’ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरवात केलीय. नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडं केलीय. नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का? आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे साहेब आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही किड काढण्यासाठी शस्त्रक्रिया कधी करणार?”, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

डॉ. भगवान पवार यांनी पत्रात काय आरोप केले?

निलंबित अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी आपल्या पत्रात आरोग्य मंत्र्यांवर अनेक आरोप केले आहेत. त्यांनी लिहिले, “मी सार्वजनिक आरोग्य विभागातील ज्येष्ठतम अधिकारी असून माझी एकूण ३० वर्षांची सेवा झालेली आहे. मागच्या पाच वर्षात माझी कामगिरी अत्यंत चांगली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची माझ्या कामाबाबत कोणतीही तक्रार नाही. करोना काळात मी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली. आयुक्त, आरोग्य सेवा, मुंबई, विभागायी आयुक्त, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडून माझा वेळोवेळी सत्कार झाला आहे.”

“माझे कामकाज आणि सेवेची नोंद उत्तम असताना केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून मला त्रास देण्याच्या हेतूने माझे निलंबन करण्यात आले आहे. मा. मंत्री महोदय यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे आणि इतर कामामध्ये मदत करण्यास दबाव आणला होता. परंतु मी नियमबाह्य कामात मदत केली नाही हा आकस मनामध्ये ठेवून माजी मानसिक छळवणूक केली आणि माझे निलंबन केले”, असा आरोप डॉ. भगवान पवार यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar big allegation on eknath shinde govt health minister after suspended bhagwan pawar letter kvg