Rohit Pawar on bogus beneficiaries of ladki bahin yojana : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या घोषणेपासून ती चर्चेचा विषय राहिलेली आहे. या योजनेचा गैरफायदा उठविणाऱ्यांविरोधात सरकारने राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्हयात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आले आहेत. यामुळे राज्यभरातील सर्व पात्र ‘लाडक्या बहिणीं’ची पुन्हा ई- केवायसी पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवारांनी यासंबंधी पोस्ट करत सरकारला धारेवर धरले आहे.
रोहित पवार काय म्हणाले आहेत?
आमदार रोहित पवारांनी ‘लोकसत्ता’ वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीचा संदर्भ देत राज्य सरकारला जाब विचारला आहे. त्यांनी एक्सवर यासंबंधी एक पोस्ट केली आहे. “लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरून घेणारी, अर्ज तपासणारी, अर्ज मंजूर करणारी अशा सर्वच यंत्रणा सरकारच्या होत्या, तरीदेखील बोगस अर्ज स्वीकारले गेलेच कसे? लाडक्या बहिणीचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह जेष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस अर्ज असल्याची आकडेवारी तर अतिशय धक्कादायक असून यावरून लाडकी बहीण योजना महायुतीने फक्त राजकीय उद्देश ठेवूनच आणली होती, हेच यातून सिद्ध होते,” असा आरोप रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे.
लाडकी बहीण योजनेतून अनेक लाभार्थी बाहेर काढले जात असल्याच्या मुद्द्यावरून देखील रोहित पवारांनी आरोप केला आहे. “गरज सरो वैद्य मरो याप्रमाणेच निवडणुकीपूर्वी लाडकी असलेली बहीण निवडणुका होताच या सरकारला परकी वाटायला लागली असून एक ना अनेक कारणं काढून या योजनेतून लाडक्या बहिणींची हकालपट्टी करण्याचे काम महायुती सरकारने चालवले आहे,” असे रोहित पवार म्हणाले आहेत.
“आपल्या राजकीय स्वार्थापायी अगोदर बहिणींना लाडकं म्हणायचं आणि स्वार्थ साधून झाला की त्यांनाच बोगस करायचं हा धंदा सरकारने तत्काळ बंद करावा आणि १५०० चे २१०० रुपये करण्याचे दिलेले आश्वासन अमलात आणावे अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये याच लाडक्या बहिणी या सरकारचा राजकीय पाणउतारा केल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशाराही रोहित पवारांनी दिला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरून घेणारी, अर्ज तपासणारी, अर्ज मंजूर करणारी अशा सर्वच यंत्रणा सरकारच्या होत्या, तरीदेखील बोगस अर्ज स्वीकारले गेलेच कसे? लाडक्या बहिणीचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह जेष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस अर्ज असल्याची आकडेवारी तर अतिशय धक्कादायक असून… pic.twitter.com/HoXXp9saKm
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 24, 2025
सर्वाधिक बोगस लाभार्थी अजित पवारांच्या जिल्ह्यात
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ४ हजार बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात १ लाख, २५ हजार ३०० लाभार्थी बोगस असल्याचे आढळून आले आहे. इतकेच नाही तर इतरही अनेक मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये सरकारची फसवणूक करणाऱ्या बोगस लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे.