Rohit Pawar on Manikrao Kokate Resignation : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या वादात अडकले आहेत. कोकाटे गेल्या अनेक दिवसांपासून विविध वक्तव्यांमुळे विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी होते. अशातच विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात लक्षवेधी सुरू असताना बाकावर बसून मोबाईलवर ऑनलाईन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्याचा कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. यावर उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत कारवाईबाबतचा सूचक इशारा दिला आहे.

अजित पवार म्हणाले, “कृषीमंत्री कोकाटे यांच्याबरोबर समोरासमोर चर्चा करून पुढील निर्णय घेऊ.” दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोकाटेंच्या कृत्यावर व वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. तसेच रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवारांसारखी हिंमत दाखवतील का?

रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे की “पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजित पवार दाखवत असलेली ही कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का? बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट पाहतोय, त्यांच्यावर देखील नेतृत्त्वाला कारवाई करावीच लागेल. बॅगवाल्या मंत्र्यांवर कारवाई करायची हिंमत एकनाथ शिंदे कधी दाखवणार? कृषीमंत्र्यांचा राजीनामा… भ्रष्ट मंत्री राजीनामा द्या…”

बॅगवाले मंत्री कोण?

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व शिवसेनेचे (शिंदे) नेते संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. “मंत्री हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत”, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्या व्हिडीओमध्ये दिसत होतं की मंत्री संजय शिरसाट एका खोलीमधील बेडवर फोनवर बोलत आहेत व सिगारेट ओढत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांच्या बेडशेजारी एक बॅग देखील दिसत होती, ज्यामध्ये नोटांची बंडलं होती. बाजूलाच शिरसाट यांचा पाळीव श्वानही होता.