Rohit Pawar Share Full Video of Manikrao Kokate Playing Rummy : महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात लक्षवेधी चालू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या बाकावर बसून निवांतपणे मोबाइलवर ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र, “माझ्या मोबाइलवर गेमचं पॉप अप आलं होतं जे मी स्किप करत होतो” असा दावा कोकाटे यांनी केला आहे. कोकाटे म्हणाले, “फोन नवीन असल्यामुळे मला लगेच स्किप करता आलं नाही आणि तेवढ्यात कोणीतरी व्हिडीओ चित्रित करून तो व्हायरल केला. अवघ्या १५-१६ सेकंदांचा व्हिडीओ हाताशी धरून माझ्यावर टीका सुरू केली आहे.
“मी सभागृहात ऑनलाइन रमी खेळत नव्हतो. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही”, असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. तसेच “या प्रकरणाची चौकशी करावी. त्यात मी दोषी आढळलो आणि मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात (नागपूर) यासंबंधी निवेदन दिलं तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन”, असंही माणिकराव कोकाटे म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांचे दावे खोटे असल्याचं म्हटलं आहे.
जाहिरात स्किप करायला ४२ सेकंद लागतात का? रोहित पवारांचा सवाल
रोहित पवार यांनी कोकाटे यांचे सभागृहात रमी खेळतानाचे दोन व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. यासह जाहिरात (पॉप-अप) स्किप करायला ४२ सेकंद लागतात का? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.
“ओसाड गावच्या पाटलांना आदिवासी बांधवांच्या प्रश्नावरील चर्चेत रस नसावा”
रोहित पवार म्हणाले, “सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं वक्तव्य धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा चालू होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे यांचं झालंय.”
कृषीमंत्र्यांचं गिरे तो भी टांग उपर : रोहित पवार
“माणिकराव कोकाटे आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती.”
“नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय”
“विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, परंतु, मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.”
आमदार रोहित पवार म्हणाले, “सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?”