राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीका केली आहे. ‘मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती,’ या राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी समाज माध्यमावरुन आपलं मत व्यक्त करताना राज्यपालांना लक्ष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यपाल नेमकं काय आणि कुठे म्हणाले?
आपण देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांचाही काळ पाहिला आहे. मात्र, पहिल्यांदा देशासाठी वीस तास काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. आमच्या प्रथा,परंपरांना लोक नावे ठेवायची. मात्र, आज मोदींमुळे देशाचा जगात गौरव वाढत आहे, अशा शब्दात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी गुणगाण गायले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं.

मोदी २० तास काम करतात…
आत्मनिर्भर भारताची गोष्ट करणारे आमचे पंतप्रधान वीस तास काम करतात. काही सहकारी सांगतात की, रात्री बारा नंतर मोदी काही वेळच आराम करत असतील तेवढेच. नाहीतर आम्ही त्यांना सतत काम करताना पाहिले आहे. आमचे हे भाग्य आहे की, आज आम्हाला असे नेतृत्व मिळाले. त्यामुळे जग आमचा सन्मान करत आहे. विदेशात असणारे माझे सगळे परिचीत मोदींमुळे आज गर्वाने भारतीय आहोत हे सांगू शकतात,असे राज्यपाल म्हणाले.

हा गुलामांचा देश असं आधी समजलं जायचं…
देशाचा स्वाभीमान जागृत झाला आहे. नाहीतर याआधी भारतात काहीच करण्यासारखे नाही, यांच्या पद्धती खराब, हा गुलामांचा देश आहे, असाच समज होता. परंतु, आमचा इतिहास गौरवशाली आहे. अलेक्झांडर, मुघल आणि ब्रिटीशांनाही या देशाने धुळ चाखली आहे. आज माेदींमुळे देश जागृत होत आहे. देशाचा केंद्रबिंदू असलेल्या नागपूर विद्यापीठाने सक्षम भारताच्या उभारणीसाठी सहयोग करावे असे आवाहनही कोश्यारी यांनी केले.

रोहित पवारांनी केली टीका…
राज्यपाल कोश्यारींच्या याच विधानांवरुन रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केलीय. “राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही,” असं रोहित पवार ट्विटरवरुन म्हणाले आहेत.

‘आधी भारतीयांना किंमत नव्हती’ असं वक्तव्य…
“आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून ‘आधी भारतीयांना किंमत नव्हती’ असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे,” असं रोहित पवार यांनी ट्विटरवरुन म्हटलंय.

राज्यपालांच्या या विधानांवरुन रोहित पवार मांडलेलं हे मत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून नोंदवण्यात आलेली ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar slams governor bhagat singh koshyari for saying there was no value to indians before modi being pm scsg
First published on: 05-08-2022 at 12:28 IST