संगमनेर : संगमनेर तालुक्यातील भोजापूर चारीला पाणी देण्याचा शब्द आठ महीन्यात पूर्ण केला. चारीच्या विस्तारीकरणासाठी ३० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला लवकरच मंजूरी देण्यात येईल. या चारीचा समावेश दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदीजोड प्रकल्पात झाल्याने येथील दुष्काळग्रस्त भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबध्द असल्याची ग्वाही पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
भोजापूर चारीला सोडण्यात आलेल्या पाण्याचे पूजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आमदार अमोल खताळ, भोजापूर चारी संघर्ष समितीचे अध्यक्ष किसनराव चत्तर, भाजपाचे श्रीकांत गोमासे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आबासाहेब थोरात, शिवसेनेचे रामभाऊ राहाणे, विठ्ठलराव घोरपडे, भीमराज चतर, प्रांताधिकारी अरूण उंडे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जलसंधारण विभागाचे अभियंता हरीभाऊ गीते यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने मंत्री विखे आणि आमदार खताळ यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना मंत्री विखे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपुर्वी याठिकाणी येवून चारीच्या कामाचे भूमिपूजन केले होते. दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने पूर चारीचे रखडलेले काम पूर्ण झाले. प्रत्यक्षपणे पाणी आल्याने दिलेल्या शब्दाची पूर्तता झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.राज्यातील महायुतीचे सरकार जनतेच्या मनातील सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला असून नदीजोड प्रकल्पाच्या माध्यामातून दुष्काळी भागातील गावांना पाणी देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे धोरण आहे.
जलसंधारण विभागाकडे असलेली भोजापूर चारी जलसंपदा विभागाकडे वर्ग झाल्याने चारीच्या कामाला गती येईल. पाणी आल्याने चारीच्या विस्तारीकरणाचा विभागाने यापुर्वीच निर्णय घेऊन ३० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला असून त्याला लवकर मंजूरी देण्यात येणार आहे. भोजापूर चारीचा समावेश दमणगंगा वैतरणा गोदावरी या प्रकल्पात करण्यात आला असून यामुळे ३३ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ मिळू शकेल. त्याचे प्रकल्प अहवाल पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले.
भोजापूर चारीच्या संदर्भात काही गावांमध्ये विनाकारण गैरसमज पसरवून देण्यात आले. यातून तालुक्यातील लोकांना काहीही मिळणार नाही. काही गावांचा समावेश करू नये म्हणून कोणी पत्र दिले याची सर्व माहीती माझ्याकडे आहे. ज्यांनी फक्त आश्वासन दिली टॅकरने पाणी आणून टाकले त्यांना जनतेने उतर देवून टाकले आहे. आमदार खताळ यांच्या माध्यमातून तालुक्यात नवा आशय प्राप्त होत असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे भोजापूर चारीचा प्रश्न सुटला असल्याचे ते म्हणाले.
रस्ते रोजगार पाण्याचे प्रश्न सोडवणार तालुक्यातील जनतेला केवळ आश्वासने देणारी माणस आज उघडी पडली आहेत. पाण्याच्या प्रश्नावरून बदनामी करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, निळवंडे आणि भोजापूरचे पाणी मंत्री विखे यांनीच आणून दाखवले. भविष्यात तालुक्यातील रस्ते, रोजगार आणि पाण्याचे प्रश्न महायुती सरकारच्या माध्यमातून सोडविणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.