RSS Centenary Celebration: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त यंदाच्या दसरा मेळाव्याला सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित होते. त्याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात, देशात व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक घडामोडी घडल्या. या पार्श्वभूमीवर आज सरसंघचालक मोहन भागवत नेमकी काय भूमिका मांडणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात गेल्या वर्षभरात घडलेल्या घटनांचा उल्लेख करत त्यावर भाष्य केलं.
यावेळी मोहन भागवत यांनी गेल्या दीड वर्षांत देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक घडामोडी घडल्याची बाब नमूद केली. या घडामोडींमुळे श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ अशा भारताच्या शेजारी देशांमध्ये आंदोलन व त्याअनुषंगाने अराजक निर्माण झाल्याचं ते म्हणाले. त्याचवेळी, वेगवेगळ्या ठिकाणी आलेल्या नैसर्गिक आपत्ती, हिमालयातील बर्फ वितळू लागल्यामुळे पूरस्थिती अशा माध्यमातून निसर्गाचा रोष आपण ओढवून घेतल्याचं ते म्हणाले. या सर्व समस्यांमधून मार्ग काढायचा असल्यास व्यवस्थेप्रमाणेच जनतेलाही आपल्या आचरणात बदल घडवून आणावे लागतील, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी नमूद केलं.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषणात उल्लेख केलेले १० प्रमुख मुद्दे…
१. ऑपरेशन सिंदूरनंतर आपले मित्र कोण हे कळलं
गेल्या वर्षी पहलगामला हल्लाही झाला. २६ भारतीयांची त्यांचा धर्म विचारून हत्या करण्यात आली.त्यानंतर देशभर दु:खाची लाट पसरली. आपल्या देशाने पूर्ण तयारीनिशी, लष्कराने त्या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं. या सगळ्यात आपल्या नेतृत्वाची दृढता, आपल्या सैन्याचं कौशल्य, समाजाच्या एकतेचं एक उत्तम चित्र उभं राहिलं. पण पहलगाम आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर या घडामोडींमध्ये आपल्याला हा धडाही मिळाला की आपण जरी सगळ्यांशी मित्रत्वाचे संबंध ठेवत असलो, तरी आपल्या सुरक्षेबाबत आपल्याला सतर्क व्हावं लागेल. तसेच, या घटनेनंतर जगातल्या वेगवेगळ्या देशांनी घेतलेल्या भूमिकेतून आपले मित्र कोण आहेत हे आपल्याला समजलं.
२. आर्थिक विकासाची दुसरी बाजू..समस्या
दरम्यान, आर्थिक विकासामुळे काही समस्याही उद्भवत असल्याचं सरसंघचालकांनी नमूद केलं. सध्याच्या प्रचलित अर्थप्रणालीत काही दोषही दिसून येतात. विकासाच्या या पद्धतीमुळे श्रीमंत व गरीबांमधली दरी वाढतेय. आर्थिक केंद्रीकरण होतंय. आपण वेळीच सावध झालो नाही तर शोषणासाठी एक नवीन सुरक्षित प्रणाली उभी राहू शकते. माणसांच्या परस्पर व्यवहारांमध्ये व्यवहारी दृष्टी व अमानवी गोष्टी प्रवेश करू शकतात.
३. ट्रम्प यांचं टॅरिफ अस्त्र आणि भारताला मिळालेला धडा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे आपण स्वावलंबी व्हायला हवं हे स्पष्ट झाल्याचं मोहन भागवत यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेनं जाहीर केलेलं धोरण इतरांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यासाठी प्रचलित आर्थिक विकासाच्या पद्धतीवर आपण अवलंबून राहता कामा नये. जगाचा गाडा परस्पर संबंधांमधूनच चालतो. एकटा देश स्वतंत्रपणे वाटचाल करू शकत नाही. पण हे अवलंबित्व नाईलाज वा सक्तीत बदलता कामा नये. त्यामुळे आपल्याला स्वदेशी व स्वावलंबनाला पर्याय नाही.
४. आर्थिक विकासाचा पर्यावरणावर दुष्परिणाम
प्रचलित आर्थिक विकासाच्या पद्धतीचे दुष्परिणाम आपल्याकडेही दिसत आहेत. हिमालयाच्या भागात काय घडतंय आपण बघतोय. पावसाचं अनियमित होणं सगळीकडे आहे. निसर्काचे कोपही वाढले आहेत. अनियमित पाऊस होतोय. हिमनद्या सुकत आहेत. या गोष्टी गेल्या ३-४ वर्षांत वाढल्या आहेत. जर सध्याच्या विकासाच्या पद्धतीमुळे नुकसान वाढत असेल, तर आपल्याला त्या धोरणांचा पुनर्विचार करावा लागेल. हिमालयाची आजची अवस्था धोक्याची घंटा वाजवते आहे.
५. शेजारी देशांमधील परिस्थितीबाबत चिंता
निसर्गासोबतच जनजीवनातही विस्कळीतपणा होत आहे. श्रीलंका, बांगलादेशमध्ये आपण हे पाहिलं. शासन कधीकधी संवेदनशील, लोकाभिमुख राहात नाही. तिथल्या जनतेची मतं लक्षात घेऊन धोरणं ठरवली जात नाहीत म्हणून असंतोष असतो. पण असंतोष अशा प्रकारे व्यक्त करणं हे कुणाच्याच हिताचं नाही. लोकशाही मार्गांनीही बदल घडू शकतो. हिंसक मार्गांनी बदल घडत नाही. गडबड-गोंधळ होतो पण परिस्थिती तशीच राहते. संपूर्ण जगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर अशा प्रकारे घडलेल्या कोणत्याच क्रांतीनं मूळ उद्देश साध्य केलेला नाही. अशा हिंसक क्रांतींमुळे देशाबाहेरील स्वार्थी शक्तींना आपल्या देशाविरोधात खेळ खेळण्याची संधी मिळते.
६. शेजारचे देश आपलेच आहेत
आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये गोंधळ होतोय. ते आपलेच देश आहेत. ते आपल्यापासून लांब नाहीत. काही वर्षांपूर्वीपर्यंत ते देश भारतच होते. तिथे अशी स्थिती निर्माण होणं हे आपल्यासाठी धोकादायक आहे. ते फक्त आपले शेजारी आहेत म्हणून नाही, ते आपलेच देश आहेत म्हणून चिंतेचा विषय आहे. आपला आत्मीयतेचा संबंध आहे म्हणून चिंता आहे.
७. बदलाबाबत माणसाचा व विज्ञान-तंत्रज्ञानाचा वेग असमान
माणसाचा विकास झाला, विज्ञान प्रगत झालं. देश वेगवेगळ्या पातळीवर जवळ आले. पण या परिवर्तनाची गती इतकी जास्त आहे की माणसांच्या बदलण्याचा वेग व विज्ञान-तंत्रज्ञान बदलण्याचा वेग याचा ताळमेळच राहिलेला नाही. त्यामुळेच माणसाच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत. युद्ध, इतर कलह चालूच आहेत. निसर्गाचा कोपही होतोय.
८. धर्म हाच उपाय, पण तो पूजा, प्रार्थना, प्रथांचा धर्म नव्हे
अर्थ व कामाच्या मागे अंध होऊन पळणाऱ्या जगाला धर्माची दृष्टी द्यावी लागेल. तो धर्म पूजा, प्रार्थना, प्रथा नाहीये. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना जोडणारा, सगळ्यांना विकसित करणारा, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा, प्रजेच्या विकासाची धारणा करणारा हा धर्म आहे. या धर्माचा मार्ग आपल्याला आपल्या उदाहरणाने जगाला दाखवावा लागेल.
९. आदर्श जीवनमानासाठी एकता हवीच
कोणत्याही देशाला आदर्श व्हायचं असेल तर समाजात एकता असायला हवी. आपण सगळ्या वैशिष्ट्यांना मानतो, स्वीकारतो, आपली वैशिष्ट्येही त्यांच्या बरोबरीच्या मानतो. ही वैशिष्ट्ये भेदभावाला कारणीभूत ठरणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. आज देशात याच विविधतांना भेदभावाचं कारण बनवल्या जात आहेत. आपापली वैशिष्ट्ये आपापल्या ठिकाणी योग्य आहेत. पण असं असलं, तरी आपण सगळे एका मोठ्या समाजाचे भाग आहोत. समाज, देश, संस्कृती व राष्ट्राच्या नात्याने आपण एकच आहोत. या एकतेमुळे आपलं परस्परांशी वागणं सद्भावनेचं असायला हवं. सगळ्यांच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत. पण आपण एकमेकांच्या चालीरीतींचा अवमान करणार नाही याची चिंता सगळ्यांनी करायला हवी. कुणी एकानं हे करून भागणार नाही.
१०. भारताची सर्वसमावेशक हिंदू संस्कृती म्हणजे काय?
आपल्या एकतेचा आधार आपली भारतीय संस्कृती आहे. ती सर्वसमावेशक आहे. सगळ्यांचा सन्मान व स्वीकार करण्याची शिकवण देते. संस्कृतीचं जतन सनातन काळापासून आजपर्यंत इथल्या हिंदू समाजाने केलं आहे. त्यामुळे कधीकधी त्या संस्कृतीला हिंदू संस्कृतीही म्हटलं जातं. भारतात या संस्कृतीला आवश्यक समृद्ध व सुरक्षित वातावरण मिळालं. पिढ्यानपिढ्या ही संस्कृती जतन व संवर्धन करण्यासाठी पूर्वजांनी कष्ट घेतले आहेत, त्याग केला आहे, बलिदान दिलं आहे. त्या संस्कृतीचं आचरण, आपल्या पूर्वजांचा गौरव, विवाकपूर्ण आचरण व आपल्या मातृभूमीची भक्त हे सगळं मिळून आपलं राष्ट्रीयत्व तयार होतं. सर्व विविधतेला एकत्र ठेवणारी आपली संस्कृती आपली राष्ट्रीयता आहे. हीच आपली हिंदू राष्ट्रीयता आहे. कुणाला हिंदू शब्दावर आक्षेप आहे. त्यांनी हिंदवी म्हणावं, भारतीय म्हणावं. हे सगळे समानार्थी शब्द आहेत. पण या राष्ट्रीयतेचं स्पष्ट स्वरूप व्यक्त करणारा एकच शब्द आहे, तो म्हणजे हिंदू.