नागपूरच्या रेशीमबाग मैदानात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) विजयादशमी सोहळा पार पडला. या सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांचे प्रबोधन केले. देशात धर्माच्या आधारावर निर्माण होणारे लोकसंख्येचे असंतुलन यापुढे नजरेआड करून चालणार नाही, असे सरसंघचालकांनी म्हटले आहे. एखाद्या देशात लोकसंख्येचा असमतोल तयार होतो, तेव्हा त्या देशाच्या भौगोलिक सीमादेखील बदलून जातात, असा इशारा भागवत यांनी दिला आहे. देशात लोकसंख्या धोरण तयार व्हायला पाहिजे. ते सर्वांसाठी समान पद्धतीने लागू व्हावे, अशी मागणी मोहन भागवत यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Dasara 2022: विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालकांकडून मातृशक्तीचा गौरव, मातृभाषा जतन करण्याचे आवाहन

“लोकसंख्येच्या असमतोलाचा परिणाम आपण ७५ वर्षांपूर्वी पाहिला आहे. २१ व्या शतकात याच समस्येमुळे पूर्व तिमोर, दक्षिण सुदान आणि कोसोवा हे तीन स्वतंत्र देश अस्तित्वात आले. इंडोनेशिया, सुदान आणि सर्बियातील लोकसंख्येच्या असमतोलाचाच हा परिणाम आहे”, असे भागवत यांनी विजयादशमी सोहळ्यात अधोरेखित केले. जन्मदरातील विषमतेबरोबरच, लोभ, लालसा, सक्तीचे मतपरिवर्तन, घुसखोरी या मोठ्या समस्या असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.

“चीनने लोकसंख्या नियंत्रण धोरण बदलून लोकसंख्यावाढीचे धोरण स्वीकारले आहे. आपल्या देशातील लोकसंख्येचादेखील देशहिताच्या दृष्टीने विचार करता येणे शक्य आहे. आज भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. ५० वर्षांनंतर आजचा युवक वर्ग ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत दाखल होईल, तेव्हा त्यांचा सांभाळ करण्यासाठी किती तरुणांची गरज असेल याचाही विचार आपल्याला आज करावा लागेल”, असा सल्ला भागवत यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwat commented on religious imbalance in countri at reshimbag rss dasara melava in nagpur rvs